औरंगाबादच्या नीरजने जिंकली अ. भा. रँकिंग टॅलेंट सिरीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:30 AM2019-03-05T00:30:33+5:302019-03-05T00:30:47+5:30
: गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर झालेल्या १२ वर्षांखालील अखिल भारतीय रँकिंग टॅलेंट सिरीज स्पर्धेत औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकरने चॅम्पियनचा बहुमान मिळवला. नाशिकच्या विराज पवारला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर झालेल्या १२ वर्षांखालील अखिल भारतीय रँकिंग टॅलेंट सिरीज स्पर्धेत औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकरने चॅम्पियनचा बहुमान मिळवला. नाशिकच्या विराज पवारला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकरने जबरदस्त खेळ करीत प्रतिस्पर्धी नाशिकच्या विराज पवार याच्यावर पूर्ण वर्चस्व राखताना अंतिम सामना ६-१, ६-0 असा सहज जिंकला. अंतिम फेरीआधी नीरज रिंगणगावकरने उपांत्य फेरीत पुणे येथील अवनीश चाफळे याचा ९-८, तर विराज पवारने पुण्याच्याच रियान मुगुळे याचा ९-६ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याआधी नीरज रिंगणगावकरने उपांत्यपूर्व फेरीत औरंगाबादच्या पार्थ कुलकर्णी याच्यावर ९-१ अशी सहज मात करीत उपांत्य फेरी गाठली होती.
मुलींच्या गटात दोन्ही सोलापूरच्या खेळाडूंत विजेतेपदाची झुंज रंगली. त्यात शुभश्री अलीने तहा झैनाब हिचा ६-१, ६-२ असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. सुभश्रीने पुणे येथील प्रिशा शिंदे हिचा पहिल्या उपांत्य फेरीत ९-३, तर तहा झैनाबने नाशिकच्या भक्ती ताजने हिचा ९-४ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीनंतर आशुतोष मिश्रा, प्रवीण गायसमुद्रे यांच्या उपस्थितीत विजेत्यांना करंडक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.