‘मेक इन इंडिया’त औरंगाबादची झोळी रिकामीच
By Admin | Published: February 16, 2016 11:50 PM2016-02-16T23:50:25+5:302016-02-17T00:46:49+5:30
संजय देशपांडे, औरंगाबाद ‘मेक इन इंडिया’ या प्रदर्शनात औरंगाबादची झोळी रिकामीच राहिली आहे. शेंद्रा- बिडकीन पार्कच्या ‘आॅरिक’सिटी या नामांतरावरच औरंगाबादची बोळवण करण्यात आली आहे.
संजय देशपांडे, औरंगाबाद
‘मेक इन इंडिया’ या प्रदर्शनात औरंगाबादची झोळी रिकामीच राहिली आहे. शेंद्रा- बिडकीन पार्कच्या ‘आॅरिक’सिटी या नामांतरावरच औरंगाबादची बोळवण करण्यात आली आहे. स्टरलाईटचा प्रकल्प नागपूरला पळविण्यावर सामंजस्य कराराद्वारे शिक्कामोर्तब करण्यात आले, तर जागतिक दर्जाचा वाहन उद्योग औरंगाबादेत येणार असल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणाही फोल ठरली आहे.
मुंबईत १३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ‘मेक इन इंडिया’ या प्रदर्शनाकडून औरंगाबादकरांना मोठ्या अपेक्षा होत्या. यानिमित्त राज्यात सहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले. त्यातून २८ लाख नवा रोजगार निर्माण होईल, असे सांगितले जात आहे; परंतु गुंतवणुकीबाबत झालेले सर्व सामंजस्य करार विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रासाठीच झाल्याचे दिसून येते. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेंद्रा- बिडकीन मेगा पार्कमध्ये एखादा मोठा उद्योग आणला जाईल, अशी ग्वाही स्वत: उद्योगमंत्र्यांनी दिली होती. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
‘आॅरिक’ ठरले स्वप्नरंजन
औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (आॅरिक) स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली होती. ‘आॅरिक’म्हणजे काही तरी भव्यदिव्य असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न यानिमित्त करण्यात आला; परंतु शेंद्रा- बिडकीन मेगा पार्कचेच हे नामांतर असून, प्रत्यक्षात औरंगाबादकरांना नवीन काहीच मिळणार नाही. ‘आॅरिक’मध्ये उद्योगांना स्वस्त विजेचा २४ तास पुरवठा, माहिती तंत्रज्ञानाचे अद्ययावत जाळे, प्रशस्त रस्ते, पाण्याचा पुनर्वापर, जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था, उद्याने, रुग्णालये उभारली जाणार आहेत; परंतु तेथे मोठा उद्योग आणण्यासाठी मात्र कसलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. मोठा उद्योग न आल्यास ‘आॅरिक’ हे स्वप्नरंजनच ठरेल, अशी भीती या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. ‘आॅरिक’ या नामांतराशिवाय ‘मेक इन इंडिया’त औरंगाबादच्या हाती काही लागले नाही.
काय म्हणाले होते उद्योगमंत्री?
‘सीआयआय’च्या ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र, इन्हेस्ट इन टू मराठवाडा’ या गुंतवणूक परिषदेचा समारोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत २९ जानेवारी रोजी झाला होता. ‘वाहननिर्मिती क्षेत्रात जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविलेला मोठा उद्योग औरंगाबादेत आणण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यात आम्हाला नक्कीच यश मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘मेक इन इंडिया’ प्रदर्शनात याबाबत अधिकृत घोषणा करतील,’ असे वक्तव्य देसाई यांनी केले होते. हा वाहन उद्योग कोणता असेल, याबाबत उद्योग जगतात चर्चितचर्वण सुरू होते. ह्युंदाई, मर्सिडीझ, महिंद्रा, अशी नावे घेतली जात होती; परंतु मर्सिडीझचा प्रकल्प चाकणला जाणार असल्याचे, तर महिंद्राची गुंतवणूक नाशिकमध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्योगमंत्र्यांची घोषणा तूर्त तरी फोल ठरली आहे.