औरंगाबादमध्ये कोजागरीच्या ‘सेलिब्रेशन’ची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 07:46 PM2018-10-23T19:46:19+5:302018-10-23T19:47:54+5:30
दसरा-दिवाळीप्रमाणेच आता कोजागरीनिमित्त घरोघरी ‘सेलिबे्रशन’ होत असून, हा आनंद द्विगुणित करण्यासाठी दूध आणि सुकामेव्याची बाजारपेठही सरसावली आहे.
औरंगाबाद : दसरा झाल्यानंतर वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला असून, कोजागरीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. गाण्यांच्या मैफली आयोजित करून आपल्या आप्तस्वकीयांसह रात्री जागरण करून सुकामेवा घालून आटविण्यात आलेले दूध प्राशन करण्याचीही अनेक ठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे. दसरा-दिवाळीप्रमाणेच आता कोजागरीनिमित्त घरोघरी ‘सेलिबे्रशन’ होत असून, हा आनंद द्विगुणित करण्यासाठी दूध आणि सुकामेव्याची बाजारपेठही सरसावली आहे.
दूध महासंघ आणि परराज्यातून येणारे दूध मिळून शहरात दररोज दोन ते सव्वादोन लाख लिटर दुधाची विक्री होते, कोजागरीनिमित्त तीन लाख लिटर दूध येणार असल्याचे सांगण्यात आले. दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक पी. बी. पाटील म्हणाले की, दररोज दूध महासंघातर्फे शहरात पन्नास हजार लिटर दूध पुरविले जाते. मागच्या वर्षी कोजागरीच्या दिवशी तीस हजार लिटर जास्तीचे दूध मागवले गेले होते. यावर्षी चाळीस हजार लिटर अतिरिक्त दूध येणार आहे.
दर महिन्यात सुकामेव्याच्या होणाऱ्या विक्रीपेक्षा कोजागरीनिमित्त होणारी विक्री ५० टक्क्यांनी अधिक असते; परंतु यंदा त्यावर दुष्काळाची छाया आहे, असे व्यापारी शिवनारायण तोतला यांनी सांगितले. चारोळी, काजू, बदाम, के शर, पिस्ता या सुकामेव्याला यानिमित्त जास्त मागणी असते.
मध्यप्रदेश, छत्तीसगढ येथील चारोळी, गोवा आणि दक्षिण भारतातून आलेले काजू, अमेरिकेहून आलेले बदाम, क ाश्मीरहून आलेले के शर आणि इराण-अमेरिकेवरून आलेले पिस्ते औरंगाबादकरांचे दूध आणखी स्वादिष्ट करणार आहेत.
दुष्काळाचा परिणाम
दरवर्षीपेक्षा यावर्षी १०-२० टक्क्यांनी सुकामेव्याची मागणी घटली. हा दुष्काळी परिस्थितीचा परिणाम असल्याचे व्यापारी शिवनारायण तोतला यांनी सांगितले.अश्विनी पौर्णिमेला लक्ष्मी देवी घराघरामध्ये फिरून ‘को-जागरी’ असे म्हणत कोण जागरण करीत आहे, हे पाहत असते. त्यामुळेच या पौर्णिमेला ‘कोजागरी’ म्हणून ओळखले जाते. ज्या व्यक्ती जागरण करतात, त्यांच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होते, अशी दंतकथा याविषयी सांगितली जाते.
खगोलीय दृष्टिकोनातून कोजागरीचे महत्त्व
२७ नक्षत्रांपैकी सर्वात पहिले नक्षत्र म्हणजे अश्विनी. तसेच अश्विनी पौर्णिमेनंतर हिवाळा सुरू होतो. दिवसा तापमान कमी आणि रात्री जरासे उबदार वातावरण या दिवसांत जाणवते. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ येऊन मोठा दिसतो. त्यामुळे सर्वत्र टिपूर चांदणे आणि चंद्राचा दुधाळ प्रकाश पडलेला असतो. हा क्षण साजरा करण्यासाठी कोजागरीची सुरुवात झाली असावी, असे शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.