औरंगाबादचा पुंडलिकनगर रस्ता बनला अनधिकृत कचरा डेपो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 07:06 PM2018-03-20T19:06:49+5:302018-03-20T19:15:18+5:30
पुंडलिकनगर मुख्य रस्त्यावर जागोजागी कचर्याचे ढीग साचल्याने हा रस्ता अनधिकृत कचरा डेपोच बनला आहे.
औरंगाबाद : पुंडलिकनगर मुख्य रस्त्यावर जागोजागी कचर्याचे ढीग साचल्याने हा रस्ता अनधिकृत कचरा डेपोच बनला आहे. कचरा जागेवरच सडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागत आहे. कचरा वेळेत उचलला गेला नाही, तर रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
कचरा प्रश्नावरून नाचक्की होऊनही महापालिकेने काहीच बोध घेतलेला नाही. महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ९३ पुंडलिकनगर भागात कचर्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने व सध्या घंटागाडी येत नसल्याने नागरिक मुख्य रस्त्यावरच कचरा आणून टाकत आहेत. जयभवानीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गजानन महाराज मंदिर या दोन ते अडीच किलोमीटर रस्त्यावर तब्बल १९ ठिकाणी कचर्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे हा रस्ता अनधिकृत कचरा डेपोच बनला आहे. महापालिकेकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने जागेवरच सडत आहे.
काही नागरिक रस्त्यावरच कचरा जाळत असून, त्यावर पुन्हा कचरा टाकला जात आहे. या भागातील लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना दुर्गंधीबरोबरच धुराचाही त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यालगतचे नागरिक तर त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी कचर्याच्या ढिगार्याजवळ रुग्णालय, खाजगी शिकवणी शाळा आहेत. लहान मुलांसह शाळकरी विद्यार्थी व नागरिक येथून ये-जा करतात. दुर्गंधीमुळे त्यांना नाक दाबून ये-जा करावी लागत आहे. या भागातील कचर्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कचर्यामुळे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून, कुत्रे वाहनांना आडवे येत असल्याने वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने रस्त्यावरील कचरा वेळेत उचलला नाही तर रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
या ठिकाणी साचले कचर्याचे ढीग ...
पुंडलिकनगर रस्त्यावरील सॅमसंग शोरूम, संत रोहिदास चौक, सेवालाल महाराज चौक, संभाजीराजे चौक, नागापूरकर हॉस्पिटल, बी.एस.जी.एम. स्कूल, पुंडलिकनगर गल्ली नं. ११, गल्ली नं. १०, गल्ली नं. ९, गल्ली नं. ६, गल्ली नं. ५ शिवाजी पुतळा पाठीमागील बाजूस, गल्ली नं. १, कै. पुंडलिक राऊत चौक, महाराणा प्रताप चौक, कुलस्वामिनी दूध डेअरीसमोर, श्री स्वामी समर्थ चौक, मेहदी आर्ट हॉस्पिटल, सृष्टी हॉस्पिटल, मलकापूर बँकेसमोर आदी ठिकाणी मुख्य रस्त्यावर कचर्याचे ढीग साचले आहेत.
बाजूच्या वॉर्डामुळे आम्हाला त्रास
कचर्याची समस्या निर्माण होताच किमान आपल्या वॉर्डात ही समस्या निर्माण होऊ नये म्हणून काही मोकळ्या जागा असलेल्या ठिकाणी वॉर्डातील कचरा कंपोस्ट करून विल्हेवाट लावली जात आहे. बाजूच्या वॉर्डातील नागरिकांकडून ये-जा करताच रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. त्याचा आम्हाला त्रास होत आहे, असे पुंडलिकनगरच्या नगरसेविका मीना गायके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.