औरंगाबादचा पारा ४३ अंशांवर; शहरवासीय उकाड्याने हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 06:47 PM2020-05-26T18:47:49+5:302020-05-26T18:48:28+5:30
पावसाळ्याच्या तोंडावर सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे.
औरंगाबाद : शहरात गेल्या तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आली असून, सोमवारी शहराचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तापमानाचा हा यंदाच्या मोसमातील नवा उच्चांक ठरला आहे. शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. शनिवारी ४२.२, रविवारी ४२.३ अंश सेल्सियस अशी तापमानाची नोंद करण्यात आली होती.
रविवारी आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदविले गेले होते. सोमवारी त्यात ०.८ अंशांनी वाढ झाली आणि तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान ४३.१ आणि किमान तापमान २७.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. त्यामुळे यंदाचे आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले आहे.उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे उकाडा अधिक तीव्रतेने जाणवत आहे. सायंकाळी ऊन कमी झाले तरी वातावरणात उकाडा कायम राहत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. दुपारच्या वेळी घरात प्रचंड उकाडा सहन करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. वाढत्या उन्हाने अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारांनी प्रत्येक जण त्रस्त होत आहे.
आणखी उकाडा वाढणार
औरंगाबाद शहराच्या कमाल तापमानात तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे. महिनाअखेरीस कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
आगामी दिवसातील तापमानाचा अंदाज
दिनांक कमाल किमान
२६ मे ४२.० २९.०
२७ मे ४३.० ३०.०
२८ मे ४३.० ३०.०
२९ मे ४४.० ३१.०
३० मे ४४.० ३१.०
३१ मे ४४.० ३१.०