औरंगाबादच्या पाणीटंचाईबद्दल आक्रोश, संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:17 AM2018-05-24T00:17:10+5:302018-05-24T00:18:11+5:30

शहरातील पाणीटंचाईबद्दल बुधवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मागील तीन महिन्यांप्रमाणेच प्रचंड ओरड आणि आक्रोश केला. या कृत्रिम पाणीटंचाईला फक्त आणि फक्त महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. हताश मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहरवासीयांची माफी मागत या प्रश्नावर तामिळनाडू येथील तज्ज्ञांना लवकरच पाचारण करण्यात येणार असल्याचे नमूद केले.

Aurangabad's water scarcity, chaos and chaos | औरंगाबादच्या पाणीटंचाईबद्दल आक्रोश, संताप

औरंगाबादच्या पाणीटंचाईबद्दल आक्रोश, संताप

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वसाधारण सभा : तामिळनाडूच्या तज्ज्ञांची मदत घेणार; पाणीटंचाईला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील पाणीटंचाईबद्दल बुधवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मागील तीन महिन्यांप्रमाणेच प्रचंड ओरड आणि आक्रोश केला. या कृत्रिम पाणीटंचाईला फक्त आणि फक्त महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. हताश मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहरवासीयांची माफी मागत या प्रश्नावर तामिळनाडू येथील तज्ज्ञांना लवकरच पाचारण करण्यात येणार असल्याचे नमूद केले.
बुधवारी सकाळी ११.३० वाजता सर्वसाधारण सभा सुरू होताच नगरसेवकांनी अत्यंत जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर चर्चा सुरू केली. तब्बल साडेतीन तास नगरसेवकांनी घसा कोरडा केला. तीन दिवसाआड पाणी देण्याचा शब्द प्रशासनाने दिला होता. यानंतरही शहरातील विविध वसाहतींमध्ये पाच आणि सहा दिवसाआड पाणी देण्यात येत आहे.
अफसर खान यांनी तीन दिवसाआड पाणी का देऊ शकत नाही, असा जाब विचारला. त्यानंतर राजू शिंदे, सचिन खैरे, विकास जैन, सीताराम सुरे, त्र्यंबक तुपे, मनीषा मुंडे, रेशमा कुरैशी, स्वाती नागरे, भगवान घडमोडे, शिवाजी दांडगे,राजू वैद्य,भाऊसाहेब जगताप, संगीता वाघुले, सुरेखा सानप यांनी चर्चेत सहभाग घेतला. पाण्यामुळे नगरसेवकपद सोडण्याची वेळ आल्याचे सुरे यांनी नमूद करताच माधुरी अदवंत यांनीही पाठिंबा दर्शविला.
कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल नगरसेवकांत भांडणे लावत असल्याचा आरोपही करण्यात आला.
प्रशासनाकडूनच भेदभाव
जुन्या शहरातील काही वसाहतींना तीन दिवसाआड पाणी येते. सिडको-हडकोला चार दिवसाआडही पाणी देण्यात येत आहे. प्रशासनाकडून असा भेदभाव का असा प्रश्न रामेश्वर भादवे यांनी केला. सिडकोवरच अन्याय का, असा संतप्त सवाल नितीन चित्ते यांनी केला.
पाणी मनपाचे; भांडण सेना नगरसेवकांमध्ये
सलीम अली सरोवराच्या बाजूला महापालिकेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. या प्रकल्पात विंधन विहिरीला भरपूर पाणी आहे. हे पाणी टँकरद्वारे जाधववाडी येथील नागरिकांना सेना नगरसेवक सीताराम सुरेदेत आहेत. त्याला एन-१२ येथील सेनेचे नगरसेवक मोहन मेघावाले यांनी कडाडून विरोध दर्शविला.
दोन्ही नगरसेवकांमध्ये सर्वसाधारण सभेतच शाब्दिक चकमक उडाली. सेनेच्या दोन वाघांमधील भांडण पाहून भाजपसह इतर राजकीय पक्षांच्या नगरसेवकांना चांगल्याच गुदगुल्या होत होत्या.
सर्वसाधारण सभेत सेनेचे नगरसेवक ज्या पद्धतीने भांडत होते ते पाहून नगरसेवक राजू वैद्य यांनी मध्यस्थी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी हा वाद नंतर बसून सोडविण्याचे आश्वासन दिल्यावर सभेतील शाब्दिक धुमश्चक्री थांबली.
सेना नगरसेवकांत वाद सुरू असताना भाजपचे सदस्य बाके वाजवत होते. काँग्रेस, एमआयएम नगरसेवकही या वादामुळे आनंदी होते.
पैसे भरून पाणी घ्या...
मनपाच्या विंधन विहिरीवरून अनेक टँकरचालक पैसे भरून पाणी नेत आहेत. नगरसेवक सुरेयांनीही पैसे भरून पाणी नेण्यास सुरुवात केली. मागील महिन्यात मोहन मेघवाले यांनी पाणी नेण्यास मनाई केली. टँकरमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतोय, असे कारण मेघावाले यांनी दिले. मागील तीन वर्षांपासून नागरिक या पाण्याचा वापर करीत आहेत. आताच त्याला विरोध करण्याचे कारण काय, असा सवालही सुरे यांनी केला.

Web Title: Aurangabad's water scarcity, chaos and chaos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.