औरंगजेब प्रकरणाचा पर्यटनावर परिणाम; खुलताबाद-वेरूळ परिसरातील हॉटेलचे बुकींग रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 19:40 IST2025-03-21T19:40:40+5:302025-03-21T19:40:58+5:30
मागील काही दिवसांत औरंगजेब कबरीवरुन सुरू झालेल्या वादाचा परिणाम पर्यटनावर होत आहे.

औरंगजेब प्रकरणाचा पर्यटनावर परिणाम; खुलताबाद-वेरूळ परिसरातील हॉटेलचे बुकींग रद्द
खुलताबाद ( छत्रपती संभाजीनगर) : जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर, खुलताबाद भद्रा मारूती तसेच विविध सुफी संताच्या दर्गा खुलताबाद परिसरात असल्याने या भागात कायम पर्यटकांचा राबता असतो. मात्र, मागील काही दिवसांत औरंगजेब कबरीवरुन सुरू झालेल्या वादाचा परिणाम पर्यटनावर होत आहे. यामुळे परिसरातील हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. पर्यटकांनी आगाऊ केलेली नोंदणी रद्द करत येथे येण्याचे टाळल्याचे दिसून येत आहे.
विविध भागातील पर्यटक सध्या वातावरण कसे आहे? अशी विचारणा करूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनाची आखणी करत आहेत. दरम्यान, वेरूळ, खुलताबाद परिसरात जवळपास १०० चांगल्या दर्जाच्या रिसोर्ट, हॉटेल, लॉजिंग आहेत. मात्र, औरंगजेब कबर प्रकरणा मुळे गेल्या १५ दिवसापासून आगाऊ नोंदणी धडाधड रद्द होत असल्याने सदरील व्यावसायिक चिंतातूर झाले आहेत. शिर्डी, वेरूळ, खुलताबाद, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर असे पर्यटनाचे मोठे सर्कीट असल्याने या ठिकाणी देशविदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे हॉटेलची ऑनलाईन बुकींग महिना पंधरा दिवस अगोदर होते. मात्र, मागील काही दिवसांपासून केवळ औरंगजेब कबर प्रकरणामुळे जो वाद व गदारोळ सुरू असल्याने बुकींग रद्द होत आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक डोक्याला हात लावून बसलेले आहेत.
अचानक बुकींग रद्द
खुलताबाद येथील हॉटेल व्यावसायिक अस्लम अहेमद शेख म्हणाले, औरंगजेब कबर प्रकरणामुळे माझ्या हॉटेलची गेल्या १५ दिवसापासून धडाधड ऑनलाईन बुकींग रद्द होत आहे त्यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
पर्यटनासाठी यावे की नाही ?
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पर्यटक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत. जिल्ह्यातील वातावरण कसे आहे, पुढे परिस्थिती कशी राहील, पर्यटनासाठी यावे की, अन्य स्थळांकडे जावे, अशी विचारणा पर्यटकांकडून टूर व्यावसायिकांना होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या वातावरण निवळले नाही तर पर्यटनाला फटका बसण्याची चिंता व्यक्त होत आहे. विशेषत: खुलताबाद, वेरुळ लेणी, देवगिरी किल्ला येथील स्थानिक रोजगार आणि उत्पन्नावर थेट परिणाम होण्याची भीती आहे.