ऑरिकमध्ये लवकरच दोन अँकर प्रकल्प येणार; राज्य शासनासोबत कंपन्यांचे बोलणे अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 12:07 PM2023-04-15T12:07:15+5:302023-04-15T12:07:32+5:30
सुनियोजित ग्रीनफील्ड औद्याेगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात जास्तीत जास्त मोठे उद्योग यावेत, यासाठी ऑरिक सिटीचे अधिकारी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअरच्या (डीएमआयसी) शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात लवकरच दोन मोठ्या कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. या कंपन्यांसोबत शासनाचे बोलणे अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुनियोजित ग्रीनफील्ड औद्याेगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात जास्तीत जास्त मोठे उद्योग यावेत, यासाठी ऑरिक सिटीचे अधिकारी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. जानेवारी महिन्यात दावोस येथे झालेल्या इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरममध्ये सुमारे सव्वाकोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार महाराष्ट्रासाठी करण्यात आले होते. यातील १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ग्रीन को कंपनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ही कंपनी ऑरिक सिटीबाहेर गुंतवणूक करणार आहे.
ऑरिकमध्ये ईव्ही मोटार उत्पादक एथर कंपनीही ऑरिकमध्ये गुंतवणूक करणार असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी झाली होती. तेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन ऑरिक सिटीतील जमिनीची पाहणी केली होती. एथर कंपनी छत्रपती ऑरिकमध्ये येण्यासाठी शासनही प्रयत्नशील असल्याची माहिती ऑरिकच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. ऑरिक सिटीमध्ये सध्या लागू असलेल्या भूखंडाच्या दरात २५ टक्के सवलत देत ऑरिकने पिरॅमल फार्मा कंपनीला १३८ एकर तर कॉस्मो फिल्म कंपनीला १७० एकर जमीन देण्यात आली होती. यापेक्षा अधिक सवलत एथर ग्रुपने मागितल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाने देऊ केेलेल्या सवलतीपेक्षा कमी दराने जमीन मिळावी, यासाठी कंपनीचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासोबतच आणखी एक मोठी कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये यावी, यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे प्रयत्न करीत आहेत. दोन्ही कंपन्यांची राज्य सरकारसोबत चर्चा सुरू आहे. या कंपन्यांना राज्य सरकारकडून आवश्यक त्या बाबींना ग्रीन सिग्नल दोन महिन्यांत मिळण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू
छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीमध्ये दोन ॲंकर प्रकल्प आणण्याचे राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. सीएमआयएच्या शिष्टमंडळाने गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठवाड्यासाठी अँकर प्रकल्पाबाबत आणि वीज अनुदान मुद्द्यावर चर्चा केली. येथे मोठा प्रकल्प यावा, यासाठी एथर एनर्जीच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.
नितीन गुप्ता, अध्यक्ष, चेम्बर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज