‘संत एकनाथ’च्या अध्यक्षांचे अधिकार काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:50 AM2018-08-03T00:50:00+5:302018-08-03T00:50:16+5:30
तातडीच्या बैठकीत निर्णय : संचालक मंडळातील मतभेद टोकाला
पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पुन्हा सचिन घायाळ शुगर कंपनीस देण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयामुळे संत एकनाथच्या संचालक मंडळात मतभेद निर्माण झाले असून गुरुवारी बोलावलेल्या संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीला
माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या गटाचे सहा संचालक सोडता उर्वरित संचालक गैरहजर राहिले. दरम्यान, कोरमअभावी रद्द झालेली आजची सभा पुन्हा अर्धा तासाच्या अवधीनंतर कारखाना उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली घेऊन न्यायालयीन व प्रशासकीय कामकाजासाठी दिलेले सह्यांचे अधिकार चेअरमन तुषार शिसोदे यांच्या कडुन काढून ते माजी आमदार तथा संचालक संजय वाघचौरे यांना देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. दुसरीकडे विद्यमान अध्यक्षांनी आजची सभा कोरमअभावी रद्द झाली असून नंतर घेतलेली सभा अवैध असल्याचे सांगितले.
२८ जुलै रोजीच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आलेला वादग्रस्त ठराव
रद्द करण्यासाठी गुरुवारी संचालक मंडळाची तातडीची सभा बोलावण्यात आली होती.
या सभेसाठी वाघचौरे गटाचे सहा संचालक यात संजय वाघचौरे, व्हाईस चेअरमन भास्कर राऊत, विजय गोरे, अण्णासाहेब कोल्हे, गोपीकिसन गोर्डे, शिवाजीराव घोडके उपस्थित होते. सभेसाठी आवश्यक असलेली कोरमपूर्ती न झाल्याने सभा रद्द करण्यात आली. रद्द झालेली सभा पुन्हा घेण्याची मागणी संचालक विजय गोरे यांनी केली व अर्धा तासाने व्हाईस चेअरमन भास्कर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा घेऊन २८ जुलैच्या सभेतील ठराव क्रमांक २ ज्या ठरावानुसार न्यायालयीन अपील, मंत्रालयातील तडजोडी करण्यासाठी चेअरमन तुषार शिसोदे यांना अधिकार दिले आहेत, तो ठराव रद्द करून हे अधिकार संचालक संजय वाघचौरे यांना देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
कार्यकारी संचालक ‘नॉट रिचेबल’
आजची तातडीची सभा झाल्यानंतर कार्यकारी संचालक एम. बी. गोर्डे हे तातडीने ‘नॉट रिचेबल’ झाले. आजच्या सभेचे इतिवृत्त घेण्यासाठी संचालक त्यांचा शोध घेत होते, मात्र ते काही उपलब्ध झाले नाही.
तातडीची सभा अवैध -अध्यक्ष
कोरमअभावी रद्द झालेली सभा पुन्हा घेण्याची तरतूद कारखाना उपविधीमध्ये नाही. त्यामुळे रद्द झालेली सभा पुन्हा त्याच दिवशी घेता येत नाही. आज झालेली सभा अवैध आहे. यामुळे या सभेत घेण्यात आलेले ठरावसुद्धा बेकायदेशीर असल्याचे चेअरमन तुषार शिसोदे यांनी सांगितले.
अध्यक्षांनी विश्वासघात केला -संजय वाघचौरे
संचालक मंडळास विश्वासात न घेता चेअरमन तुषार शिसोदे यांनी केलेल्या तडजोडी संशयास्पद व कारखान्याच्या हितास बाधा पोहचविणाऱ्या असल्याने ११ संचालकांच्या सह्या घेऊन आम्ही तातडीची सभा बोलावली होती. परंतु दबावाखाली काही संचालक हजर राहिले नाही. यामुळे कोरमअभावी रद्द झालेली सभा नियमानुसार पुन्हा अर्धा तासाने घेऊन कारखान्याच्या सभासदाचे, कामगारांचे हितरक्षण केले, असे संजय वाघचौरे यांनी सांगितले.