ऑटो इंडस्ट्रीजमध्ये ६ महिने राहणार मंदीची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 04:45 PM2019-09-16T16:45:11+5:302019-09-16T16:47:59+5:30
औरंगाबाद व पुणे शहराला मंदीचा सर्वाधिक फटका
औरंगाबाद : देशात मंदीची लाट असून, याचा सर्वाधिक फटका हा ऑटो उद्योग क्षेत्राला बसला आहे. राज्यात ऑटो इंडस्ट्रीज ओळख असणाऱ्या औरंगाबाद व पुणे शहराला मंदीचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुढील सहा महिने ऑटो इंडस्ट्रीजमध्ये मंदीची लाट राहील, अशी माहिती सीए इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष सीए उमेश शर्मा यांनी दिली.
टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्याचबरोबर वर्षभर होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी शर्मा म्हणाले की, अमेरिका-चीन व्यापार युद्ध, परदेशी गुंतवणूक करणाऱ्यांनी पैसा काढून घेतल्याने देशात मंदीची लाट आहे. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम झालेला नाही. बांधकाम व्यवसाय सुरळीत सुरू असून, शासनाच्या गृह योजनांमुळे नागरिकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे मंदी फार काळ टिकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टॅक्स प्रॅक्टिशनर औरंगाबाद ही व्यापाऱ्यांना कठीण अशा कर कायद्याचे पालन करण्यासाठी नेहमी मदत करते. व्हॅटचे सुधारित रूप म्हणजे जीएसटी आहे. जीएसटीत आतापर्यंत ४०० वेळा बदल झाले आहेत. जीएसटीत रिव्हाईस रिटर्न भरण्याची तरतूद नसल्याने व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नवीन बदल केल्यास त्याची तात्काळ अंमलबजावणी सिस्टीमवर होत नाही. शिवाय सिस्टीम व्यवस्थित नसल्याने सतत त्रास होतो. त्यामुळे विवरणपत्रात एखादी चूक राहिली तर ती दुरुस्त करायला वार्षिक विवरणपत्रापर्यंत थांबावे लागते. त्यामुळे व्यापाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे शर्मा म्हणाले.
वरिष्ठ कर सल्लागार एन. बी. कुलकर्णी म्हणाले, कर कायद्याचे पालन ही जबाबदारी व्यापारी बंधूंची आहे व आम्ही त्यामध्ये त्यांना मदत करतो. तसेच वर्षभर होणाऱ्या विविध उपक्रमांची कुलकर्णी यांनी माहिती दिली.यावेळी असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष सीए नितीन शर्मा, सचिव सीए जयंत जोशी, स्टडी सर्कल अध्यक्ष सीए आलोक सिंग, संस्थेचे माजी अध्यक्ष वरिष्ठ कर सल्लागार एन. बी. कुलकर्णी, सी. यू. देवडा, सचिव सीए जयंत जोशी, संस्थेचे नवनियुक्त सहसचिव इरफान शेख, कोषाध्यक्ष अमुल अग्रवाल तसेच सभासद आनंद गायकवाड, वरिष्ठ सीए व कर सल्लागार विवेक जोशी, शंकरराव आंबिलकर, पंकज पल्लोड, आदिल देशमुख आदींची उपस्थित होती.