टोमॅटो, मिरची अन् वांग्याची रोप लावणार स्वयंचलीत यंत्र; विद्यार्थ्यांच्या संशोधनास देशात दुसरे बक्षीस
By राम शिनगारे | Published: June 12, 2023 07:42 PM2023-06-12T19:42:59+5:302023-06-12T19:46:20+5:30
बळीराजाचे श्रम कमी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या संशोधनास देशातून दुसरे पारितोषिक
छत्रपती संभाजीनगर : शेतात काढलेल्या सरीवर टोमॅटो, मिरची अन् वांग्याची रोप लावायची असतील तर आता माणसाची गरज लागणार नाही. ट्रेमध्ये ठेवलेली रोपे स्वयंचलीत यंत्र जमिनीमध्ये लागवड करणार आहे. अशा अत्याधुनिक यंत्राची निर्मिती छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. हे यंत्र राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर देशातून द्वितीय क्रमांक पटकावला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांनी दिली.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या कल्पनेला संधी मिळण्यासाठी सोसायटी फॉर ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स इंडिया दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्पर्धा आयोजित करीत असते. यावर्षी जॉन डिअर इंडिया प्रा.लि. व महिंद्रा ॲण्ड महिंद्रा यांच्य संयुक्त विद्यमाने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात नुकतीच दोन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. त्यामध्ये 'स्वयंचलीत पालेभाजी रोपण यंत्र' हा विषय देण्यात आला होता. यामध्ये छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी देशी बनावटीचे साहित्य वापरून महाविद्यालयाच्या कार्यशाळेत एका यंत्राची निर्मिती केली. त्या यंत्रातून टोमॅटो, मिरची, वांगी यासारख्या भाज्यांची लागवड यंत्राच्याद्वारे करता येत आहे.
देशभरातून या स्पर्धेत एकुण ५४ अभियांत्रकी व कृषी महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. दोन टप्प्यात झालेल्या या स्पर्धेत छत्रपती शाहू अभियांत्रकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेले यंत्र उत्कृष्ट ठरले. अंतीम फेरीत या यंत्रास द्वितीय पारिषोषिक मिळाले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, उपप्राचार्य डॉ. देवेंद्र भुयार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
एक लाख रुपयांचे पारितोषीक
देशभरातून आलेल्या महाविद्यालयांमध्ये छत्रपती शाहू अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांच्या संघाने तयार केलेल्या यंत्राला द्वितीय पारितोषीक मिळाले. या पारितोषीकाची रक्कम १ लाख रुपये एवढी आहे. विद्यार्थ्यांच्या संघाचे नेतृत्व वैभव जाधव याने केले. विद्यार्थ्यांच्या संघास प्रा. सचीन लहाने, प्रा. युवराज नरवडे, शुभम गुप्ता, यांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.आर.पी.चोपडे, प्रशिक्षणचे प्रा. संजय कुलकर्णी, डॉ. मनोज मते, प्रा. एस.एन. पाटील, प्रा. विष्णू खडप, प्रा. सुनील जाधव, प्रा. दीपक पवार, प्रा. अनिल मालकर आणि जनार्धन कांबळे यांनी सहकार्य केले.