हळहळ! गर्भवतीस १५ दिवसांनी बोलावलं, रस्त्यात प्रसूती होऊन दगावलेल्या बाळाचे शवविच्छेदन
By संतोष हिरेमठ | Published: March 22, 2023 12:30 PM2023-03-22T12:30:47+5:302023-03-22T12:31:56+5:30
दुसऱ्या दिवशीही नातेवाइकांचा संताप; ‘ड्यूटी’वरील प्रत्येकाची चौकशी, दोन दिवसांत येणार चौकशी अहवाल
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा रुग्णालयातून परत पाठविल्यानंतर घरी जाताना गरोदर मातेची रस्त्यातच प्रसूती होऊन मृत्यू पावलेल्या बाळाचे मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समिती आगामी दोन दिवसांत अहवाल देईल. कर्तव्यावर असलेल्या प्रत्येकाची चौकशी केली जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे यांनी सांगितले.
प्रसूतीला अजून १५ दिवस वेळ आहे, असे म्हणून चिकलठाणा परिसरातील रहिवासी सुनीता नाडे यांना सोमवारी जिल्हा रुग्णालयातून परत पाठविण्यात आले. मात्र, घरी जाताना वाटेतच प्रसूती होऊन नवजात शिशू दगावले. या घटनेनंतर सोमवारी सायंकाळी नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त करीत कारवाईची मागणी केली. याप्रकरणी चौकशी समिती नेमल्याचे सांगितल्यानंतर सर्व जण माघारी फिरले. मात्र, जिल्हा रुग्णालयात मंगळवारीदेखील नातेवाईक, चिकलठाणा परिसरातील नागरिक दाखल झाले आणि कारवाईसंदर्भात विचारणा केली. त्यामुळे रुग्णालयात गोंधळाचे वातावरण होते.
गरज पडली तर रिक्षाचालकाचाही जबाब
याप्रकरणी स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. कमलाकर मुदखेडकर, डाॅ. बालरोगतज्ज्ञ डाॅ. भारती नागरे आणि न्यायवैद्यकशास्त्रतज्ज्ञ डाॅ. गोरख सुरमवाड यांची समिती नेमण्यात आली आहे. सुनीता नाडे या रुग्णालयात ज्या वेळी आल्या, त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येणार आहे. गरज पडली तर रस्त्यावर प्रसूती झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणणाऱ्या रिक्षाचालकाचाही जबाब घेतला जाणार आहे. या चौकशीचा अहवाल काय येतो, कोणावर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अवघ्या काही तासांच्या शिशूचे शवचिच्छेदन
वयस्क व्यक्तींचे शवविच्छेदन हे नेहमीच होते. परंतु केवळ काही तासांच्या शिशूचे शवविच्छेदन होणे, हे अनेकांसाठी हळहळ व्यक्त करणारे ठरले. अनेक प्रकरणात लहान बाळांचे शवविच्छेदन होत असल्याचे घाटीतील न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डाॅ. कैलास झिने यांनी सांगितले.