सहायक फौजदाराच्या सुनेचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट
By | Published: December 8, 2020 04:02 AM2020-12-08T04:02:33+5:302020-12-08T04:02:33+5:30
सहायक फौजदार सासरा समिऊद्दीन चिरागोद्दीन सिद्दीकी, पती अनिसोद्दीन सिद्दीकी, सासू आशा सिद्दीकी, दीर दानिश सिद्दीकी (सर्व रा. अबरार ...
सहायक फौजदार सासरा समिऊद्दीन चिरागोद्दीन सिद्दीकी, पती अनिसोद्दीन सिद्दीकी, सासू आशा सिद्दीकी, दीर दानिश सिद्दीकी (सर्व रा. अबरार कॉलनी, सातारा परिसर), अशी आरोपींची नावे आहेत. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा नोंद आहे. बीबी कुलसूम अनिसोद्दीन सिद्दीकी (२७, रा. अबरार कॉलनी, सातारा परिसर) या विवाहितेचा ५ ऑक्टोबर रोजी सकाळी घरात मृतदेह आढळून आला होता़ त्यावेळी ती सहा महिन्यांची गर्भवती होती़ तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी मृतदेह पाहिल्यावर अंगावर मारहाणीचे व्रण होते. त्यामुळे माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी पोलिसांनी समजूत काढून हुंडाबळीच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, विवाहितेचा शवविच्छेदन अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला. या अहवालानुसार विवाहितेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणात सातारा पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचे कलम वाढविले. या गुन्ह्याचा तपास महिला तक्रार निवारण मंचच्या अधिकारी करीत आहेत.