अवैध नळ जोडणी करणा-यांविरुद्ध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 05:43 PM2017-07-30T17:43:34+5:302017-07-30T17:47:50+5:30
अवैध नळ जोडणीची बाब समोर येताच शनिवारी (दि. २९) महानगर पालिकेच्या अधिका-यांनी घटनास्थळाला भेट दिली. यानंतर या २२ नागरिकांविरुद्ध अवैध नळ जोडणी करून महापालिकेच्या जलवाहिनेचे नुकसान करणे व पाणी चोरी केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हे नोंदविले.
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. ३० : मुख्य जलवाहिनी फोडून विनापरवाना नळ जोडणी करणे चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनी येथील नागरिकांना चांगलेच महागात पडले. अवैध नळ जोडणीची ही बाब समोर येताच शनिवारी (दि. २९) महानगर पालिकेच्या अधिका-यांनी घटनास्थळाला भेट दिली. यानंतर या २२ नागरिकांविरुद्ध अवैध नळ जोडणी करून महापालिकेच्या जलवाहिनेचे नुकसान करणे व पाणी चोरी केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हे नोंदविले.
सुनील कोरडे, सुंदरराव खेत्रे, सोमीनाथ दहिहंडे, शब्बीर बागवान, भगीरथ परदेशी, शाम वाघमारे, रंजीत ढाकणे, रामेश्वर ढवळणपुरे, नवपुते वॉशिंग सेंटरचालक, जगन्नाथ रिठ्ठे, साईनाथ धोत्रे, हॉटेल आशादिपचा चालक, संताराम नवपुते, यमाजी रिठ्ठे, शांतीलाल रिठ्ठे, घोरे, वाघ आणि पोपळघट(पूर्ण नावे कळू शकली नाहीत)आणि पोलीस कर्मचारी निवासस्थान क्रमांक ७ आणि ८ मधील रहिवासी अशी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या नागरीकांची नावे आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, चौधरी कॉलनी परिसरातील नळ कनेक्शनची तपासणी गेल्या काही दिवसापासून मनपाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. या तपासणीत तेथील अनेक व्यवसायिक, हॉटेलचालक आणि नागरीकांनी मुख्य जलवाहिनी फोडून अवैध नळ जोडणी केल्याचे समोर आले. १९ एप्रिल २०१७ पासून हि अनधिकृत नळजोडणी करणे सुरु होते.
विशेष म्हणजे या अवैध नळ जोडण्या केलेल्या नागरिकांसोबतच या जोडण्या करून देणा-या प्लंबरलाही यात आरोपी केले जाणार आहे. याप्रकरणी महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता इलियास खाजा यांच्या चोरून नळ जोडण्या करून मुख्य जलवाहिनीचे नुकसान करणे व पाण्याची चोरी केल्याच्या तक्रारीवरून पोलीस नाईक कोलते गुन्ह्याचा तपास करीत आहेत.