अवैध वाळू उपशाविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:28 AM2017-07-31T00:28:56+5:302017-07-31T00:28:56+5:30
नांदेड: शहरापासून काही अंतरावरील सोमेश्वर येथे वाळू ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू केला असून त्याच्याविरुद्ध प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याची तक्रार करत समाजवादी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे दोन दिवसांपासून उपोषण करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

सोमेश्वर येथील वाळूघाटावर विनापरवानगी रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्यासाठी ५०० ब्रासहून अधिक मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार २७ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला तर रेती ठेक्याच्या परिसरात अवैधरित्या ९ हजार ब्रासचा साठा करण्यात आला आहे. या सर्व बाबी प्रशासनाच्या चौकशीत पुढे आल्या आहेत.
असे असताना सदर ठेकेदाराविरुद्ध कोणतीही कार्यवाही महसूल विभागाने केली नाही. गौण खनिज विभाग याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. त्याचवेळी अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी आपले उखळ पांढरे करुन घेत असल्याचा आरोप उपोषणार्थी सय्यद मोहसीन यांनी केला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाºयांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला ठोठावलेला दंड वसूल करावा, गौण खनिज विभागाचे अधिकारी, कर्मचारी, संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.