शहरातून प्रतिदिन सरासरी तीन वाहनांची होतेय चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 07:45 PM2019-07-12T19:45:35+5:302019-07-12T19:47:13+5:30
गुन्हे उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प
- बापू सोळुंके
औरंगाबाद : शहरात वाहन चोऱ्यांचे प्रमाण ६ महिन्यांपासून वाढल्याचे दिसते आहे. औरंगाबाद शहरातून प्रतिदिन सरासरी ३ वाहने चोरटे पळवीत आहेत. वाढत्या वाहन चोऱ्यांचा थेट फटका मध्यमवर्गीय आणि गरिबांना बसत आहे. वाहन चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याने या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
शहरातील प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे आणि त्यांच्या चल, अचल संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. याकरिता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १७ ठाणे आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत. एवढे मोठे पोलीस बल असताना गतवर्षीच्या तुलनेत शहरातील वाहन चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
मागील ६ महिन्यांच्या कालावधीत शहराच्या विविध भागांतून प्रतिदिन सरासरी ३ वाहने चोरीला जात आहेत. यात सर्वाधिक दुचाकी आहेत. गतवर्षी २०१८ मध्ये पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल ७४५ वाहने चोरीला गेल्याची नोंद झाली होती. त्यापैकी केवळ १६९ वाहने चोरट्यांकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र वाहन चोरी वाढल्याचे आकडेवारीवरून दिसतेय.
यावर्षी जानेवारी ते जूनअखेरपर्यंत तब्बल ४५० वाहने चोरट्यांनी लंपास केली आहेत, तर जानेवारी ते एप्रिलपर्यंत हा आकडा ३०५ एवढा होता. गतवर्षी याच कालावधीत चोरीला गेलेल्या वाहनांची संख्या १८० होती. गतवर्षी एप्रिलमध्ये ५२ वाहने चोरीला गेली, तर
यावर्षी हा आकडा ७५ वर पोहोचला.
गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या वाहनांवर चोरट्यांची वक्रदृष्टी
सार्वजनिक वाहतुकीची अपुरी व्यवस्था आणि रिक्षाचा महागलेला प्रवास परवडत नसल्याने गरिबांपासून श्रीमंतांना दुचाकी बाळगणे अनिवार्यच झाले आहे. कर्ज घेऊन अथवा पोटाला चिमटा घेऊन जमविलेल्या पैशातून मोटारसायकल खरेदी केली जाते. यात काही जण नवीन तर काही लोक जुनी दुचाकी खरेदी करतात.
मोठे पोलीस बल तरीही वाहन चोऱ्या वाढल्या
शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे साडेतीन हजार पोलीस कर्मचारी, स्वतंत्र गुन्हे शाखा, १७ पोलीस ठाणे कार्यरत आहेत; परंतु सिडको, एमआयडीसी सिडको आणि गुन्हे शाखेकडून गुन्हे उकल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. अन्य ठाणेदार केवळ गुन्ह्याची नोंद घेऊन मोकळे होतात, असे दिसते. परिणामी, वाहन चोऱ्यांना ब्रेक लावणे दिवसेंदिवस अशक्यच होत आहे.