मराठवाड्यात सरासरी ५९ टक्के पावसाची तूट; पेरण्या खोळंबल्या, परिस्थिती गंभीर वळणावर
By विकास राऊत | Published: July 5, 2023 12:17 PM2023-07-05T12:17:14+5:302023-07-05T12:18:34+5:30
धरणांमध्ये केवळ ३३ टक्के पाणी; जून महिन्यात मोठ्या धरणांमध्ये पाण्याची आवक शून्य टक्के
छत्रपती संभाजीनगर : पावसाअभावी मराठवाड्याची परिस्थिती गंभीर वळणावर आली आहे. जून महिन्यातील १३४ मि.मी. सरासरीच्या तुलनेत ५५ मि.मी. पाऊस विभागात झाला आहे. ५९ टक्के पावसाची तूट गेल्या महिन्यात राहिल्यामुळे त्याचा परिणाम खरीप हंगामातील पेरण्यांवर झाला आहे.
चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करीत असलेल्या आठही जिल्ह्यांत यंदाचा जून महिना समाधानकारक राहिला नाही. जुलै महिन्यात दमदार पाऊस होईल, असे भाकित हवामान खात्याने केले आहे; परंतु पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचे संकट देखील येण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थिती पाहता टँकरने पाणीपुरवठा, विहिरी अधिग्रहण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
धरणांमध्ये ३३ टक्के पाणी
मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांमध्ये ३३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी ४१ टक्के साठा होता. जायकवाडी धरणात २६ टक्के, निम्न दुधना २५, येलदरी ५५, सिद्धेश्वर प्रकल्प कोरडा आहे. माजलगाव प्रकल्पात १६.७१ टक्के, मांजरा २०, पैनगंगा ४२, मानार ३२, निम्न तेरणा २९, विष्णुपुरी ३९, तर सीना कोळेगाव प्रकल्पात ५ टक्के उपयुक्त जलसाठा सध्या आहे.
जूनमध्ये किती पावसाची तूट?
विभागाच्या वार्षिक सरासरीनुसार जूनमध्ये १३४ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. ५५ मि.मी.पाऊस झाला असून, हा ४१ टक्केच पाऊस आहे. त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. जून महिन्याच्या एकूण सरासरीनुसार औरंगाबादमध्ये ५८ टक्के, जालना ४६, बीड ४३, लातूर ४४, धाराशिव २६, नांदेड २९, परभणी ३८, हिंगोलीत २६ टक्के पाऊस झाला आहे.
टँकरचा आकडा शतकाकडे
८५ गावे आणि २४ वाड्यांमध्ये ९९ टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ४३ गावांना ३७ टँकर, जालना २८ गावांना ४४ टँकर, तर हिंगोलीत १० गावांना १२ टँकर, नांदेडमध्ये ४ गावांना ६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ९५५ विहिरींचे प्रशासनाने अधिग्रहण केले आहे.
पेरण्यांचा टक्का वाढेना
मराठवाड्यात आजवर २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी ४५ टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्या होत्या. पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांचा टक्का वाढत नसून याचा परिणाम पीक उत्पादकतेवर होण्याची शक्यता आहे.