उत्तरपत्रिका जळाल्या प्रकरणातील 'त्या' विद्यार्थ्यांना मिळाले सरासरी गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:28 PM2018-05-31T12:28:17+5:302018-05-31T12:37:35+5:30
बीड जिल्ह्यातील केज येथे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या १३०७ उत्तरपत्रिका जळाल्या होत्या. या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली होती.
औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील केज येथे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या १३०७ उत्तरपत्रिका जळाल्या होत्या. या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली होती. जळालेल्या उत्तरपत्रिकांमुळे विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे गुणदान करणार याविषयी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र या विद्यार्थ्यांना सरासरी गुण बहाल करण्यात आले असल्याची माहिती विभागीय मंडळाच्या अध्यक्षा सुगता पुन्ने यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील केज येथील केंद्रात परीक्षा झाल्यानंतर जमा केलेल्या उत्तरपत्रिका रविवार असल्यामुळे डाक विभागाकडून तपासण्यासाठी पाठविण्यात आल्या नव्हत्या. या उत्तरपत्रिका रविवारच्या दिवशी मध्यरात्री जळून खाक झाल्या होत्या. या प्रकारामुळे राज्यभर गोंधळ उडाला होता. राज्य परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जळीत उत्तरपत्रिकांची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. याच वेळी उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना गुणदान कोणत्या पद्धतीने करावे, हाही प्रश्न निर्माण झाला होता.
याविषयीचा अहवाल औरंगाबाद विभागीय मंडळाकडून राज्य शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आला. यावर राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यकारी परिषदेने निर्णय घेऊन उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना इतर विषयात पडणाऱ्या गुणांच्या आधारे सरासरी काढून तेवढे गुण बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय परीक्षांच्या नियमानुसारच घेण्यात आला असल्याचे पुन्ने यांनी स्पष्ट केले.
मात्र, या विद्यार्थ्यांनी त्यांना असलेल्या हक्कानुसार उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मागितल्यास काय उत्तर देणार, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी विद्यार्थ्यांना वस्तुस्थितीची माहिती देणार असल्याचेही सांगितले. या प्रकरणात बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक कस्टोडियन, ११ शिक्षक आणि तीन शिपायांना निलंबित केले आहे. उत्तरपत्रिका नेमक्या कशामुळे जळाल्या याची चौकशी सुरूच असल्याचे पुन्ने म्हणाल्या.
ना महाविद्यालयांची आकडेवारी, ना विद्यार्थ्यांची...
विभागीय परीक्षा मंडळांतर्गत कार्यरत असलेल्या महाविद्यालयांनुसार निकालाची आकडेवारीच मंडळाकडे नसल्याचे स्पष्ट झाले. सर्वात कमी आणि सर्वाधिक निकाल लागलेल्या महाविद्यालयांची यादी मागितली असता, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यादी देण्यास असमर्थता दर्शविली. ही यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच उत्तरपत्रिका जळालेल्यांपैकी किती विद्यार्थी नापास झाले आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना कसे गुणदान करणार, असा प्रश्न उपस्थित केला असता, मंडळ अध्यक्षांनी यावर अधिक बोलणे टाळले.