विद्यापीठाची बदनामी टाळा, वादग्रस्तांच्या नियुक्त्या करू नका; तीन अधिसभा सदस्यांची मागणी
By राम शिनगारे | Published: February 8, 2024 05:53 PM2024-02-08T17:53:20+5:302024-02-08T17:53:34+5:30
विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी प्रभारी प्रकुलगुरूपदावर नियुक्ती दिल्यानंतर ४८ तासांमध्येच पदभार काढून घेण्यात आला. या तडकाफडकीच्या निर्णयामुळे विद्यापीठाची मोठी बदनामी झाली.
छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिलेले आहे. त्यामुळे विद्यापीठाची बदनामी होऊ नये, यासाठी आरोप असलेल्या व्यक्तींना प्रकुलगुरू, अधिष्ठातासह इतर संवैधानिक पदांवर नियुक्ती देण्यात येऊ नये, अशी मागणीच तीन अधिसभा सदस्यांनी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे केली आहे.
विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी प्रभारी प्रकुलगुरूपदावर नियुक्ती दिल्यानंतर ४८ तासांमध्येच पदभार काढून घेण्यात आला. या तडकाफडकीच्या निर्णयामुळे विद्यापीठाची मोठी बदनामी झाली. यासंदर्भात विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे, प्रा. सुनील मगरे आणि डॉ. उमाकांत राठोड यांनी कुलगुरूंची बुधवारी भेट घेतली. तेव्हा या सदस्यांनी मागील काळात ज्या व्यक्तींवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. काहींच्या विरोधातील याचिका प्रलंबित आहेत. अशा वादग्रस्त व्यक्तींची नियुक्ती प्रकुलगुरू, अधिष्ठातासह इतर महत्त्वाच्या पदांवर करण्यात येऊ नये. विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आहे. त्यामुळे कोणत्याही विचारसरणीच्या व संघटनांच्या दबावाला बळी न पडता वादातीत व्यक्तींची निवड करण्यात येऊ नये, असेही अधिसभा सदस्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
गुणवत्तेला प्राधान्य द्या
विद्यापीठात नियुक्त्या करताना कोणत्याही गटातटाचा विचार न करता गुणवत्ता धारण करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे, त्यामुळे विद्यापीठाची बदनामी होणार नाही. त्यामुळे वादग्रस्त व्यक्तींना टाळून गुणवत्तेलाच प्राधान्य देण्याचा आग्रही अधिसभा सदस्यांनी कुलगुरूंकडे धरला आहे.