पावसाळ्यातील हानी टाळा; जीर्ण, कीड लागलेले झाड असेल तर मनपाला कळवा
By मुजीब देवणीकर | Published: May 30, 2024 07:52 PM2024-05-30T19:52:03+5:302024-05-30T19:53:59+5:30
मागील महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शहरात ८५ पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली.
छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडतात. काही नाजूक झाडांच्या फांद्या वादळी वाऱ्याने पडतात. त्यामुळे जीवित किंवा वित्तीय हानी होण्याची शक्यता असते. हे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील, परिसरातील जीर्ण, वाळलेले, कीड लागलेले झाड निदर्शनास आल्यास त्वरित महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान येथे लेखी आणि फोटोसह कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शहरात ८५ पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी झाडे वाहनांवर कोसळली. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. झाड कोसळल्यानंतर ते पूर्णपणे कापून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अग्निशमन विभागाला मोठी कसरत करावी लागते. अनेकदा झाडाच्या फांद्या विजेच्या तारांवर कोसळतात, त्यामुळे संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा खंडित होतो.
नागरिकांना आपल्या आसपासच्या परिसरात अशा पद्धतीचे धोकादायक झाड कुठे निदर्शनास आले तर त्यांनी अर्ज, रंगीत फोटोसह मनपाच्या उद्यान विभागाला कळवावे, असे आवाहन प्रशासकांनी केले. एखादे धोकादायक झाड तोडणे आवश्यक असेल तर वृक्ष प्राधिकरण समितीकडून परवानगी दिली जाईल. या शिवाय मनपाच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांची झोननिहाय नियुक्ती या कामासाठी केली आहे.