अनावश्यक खर्च टाळल्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:04 AM2020-12-31T04:04:41+5:302020-12-31T04:04:41+5:30
विद्यापीठ : ऑनलाइन दोन टप्प्यात होणार पेट ५ ---- औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारल्यापासून ...
विद्यापीठ : ऑनलाइन दोन टप्प्यात होणार पेट ५
----
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारल्यापासून गुणवत्तावाढीबरोबरच आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. अनावश्यक खर्चाला मर्यादा घातल्या. यामुळे विद्यापीठाचे सात कोटी रुपये वाचले, असा दावा कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी केला. कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणे विद्यापीठानेही गुणवत्ता व व्यावसायिक क्षेत्राने मोठे फेरबदल करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे आदी उपस्थिती होते. ते म्हणाले, दीड वर्षापूर्वी पदभार स्वीकारताच बिल मंजुरीचा अधिकार स्वतःकडे घेतला. त्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसला. १ जानेवारीपासून ‘फाइल ट्रॅकिंग सिस्टीम’ सुरू केल्याने पारदर्शकता, गतिमानता व सुसूत्रीपणा आला. येत्या १ जानेवारीपासून ‘लिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम’ सुरू करण्यात येणार आहे, त्याने सर्व कर्मचारी व प्राध्यापक यांचा रजेचा अर्ज, मान्यता, नोंद हे सर्व ऑनलाइन असेल, असे कुलगुरु डाॅ. येवले यांनी सांगितले.
---
‘पेट’चा पहिला पेपर ३० जानेवारीला
--
गेल्या चार वर्षांपासून रखडलेली पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात (पेट-५) ही १ जानेवारीपासून राबविण्यात येणार आहे. ‘एम.फिल’चा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे ‘पेट’ची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन घेण्यात येणार आहे. १ ते ११ जानेवारीदरम्यान ऑनलाइन नोंदणी करण्यात येईल, तर ३० जानेवारी २०२१ रोजी ‘पेट’ पहिला पेपर घेण्यात येणार आहे. १ फेब्रुवारीला निकाल घोषित करण्यात येईल.
---
दुसरा पेपर २१ फेब्रुवारीला
--
२१ फेब्रुवारीला दुसरा पेपर घेण्यात येईल, तर २४ फेब्रुवारीला निकाल लागेल. दोन्ही पेपरचा निकाल २८ फेब्रुवारीला लागेल. प्रमाणपत्र वितरित करण्यात येतील. पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल, पाच वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आदी) विद्यार्थ्यांची मार्चमध्ये पीएच.डीसाठी नोंदणी, तर एप्रिल महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. ४२ विषयात ‘पेट’ होणार असून, विषयनिहाय रिक्त जागा व गाइडची संख्याही प्रकाशित करण्यात येणार आहे, असेही कुलगुरु म्हणाले.