पैठणला अवतरले आधुनिक गाडगेबाबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:59 AM2018-01-10T00:59:39+5:302018-01-10T01:00:55+5:30
कष्टाच्या कमाईतून दोन पैसे समाजकार्यासाठी लावताना तीनदा मन मागेपुढे होते, अशा परिस्थितीतून सध्या समाजमनाची वाटचाल सुरू आहे. या परिस्थितीत शेतीच्या उत्पन्नातून कमावलेले लाखो रुपये पैठणसारख्या मोठ्या शहरातील स्वच्छतेसाठी घेऊन डॉ. धोंडीभाऊ पुजारी नावाचे सद्गृहस्थ मंगळवारी पैठणमध्ये दाखल झाले.
संजय जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : कष्टाच्या कमाईतून दोन पैसे समाजकार्यासाठी लावताना तीनदा मन मागेपुढे होते, अशा परिस्थितीतून सध्या समाजमनाची वाटचाल सुरू आहे. या परिस्थितीत शेतीच्या उत्पन्नातून कमावलेले लाखो रुपये पैठणसारख्या मोठ्या शहरातील स्वच्छतेसाठी घेऊन डॉ. धोंडीभाऊ पुजारी नावाचे सद्गृहस्थ मंगळवारी पैठणमध्ये दाखल झाले. अवघ्या पैठण शहराला वेढा घातलेल्या वेड्याबाभळी जमीनदोस्त करून शहर स्वच्छ करून मी निघून जाईन, मला कुणाचे दोन पैसे नकोत की कुणाचा सत्कार नको, अशी भूमिका पुजारी यांनी मांडली. त्यांनी सोबत आणलेल्या यंत्रणेने जोमाने कामास सुरुवातही केली. बाबा आमटेंचा सहवास लाभलेल्या या स्वच्छतेच्या दूताचे आभार कसे मानावे, हे मात्र पैठणकरांना कळेनासे झाले होते.
पैठण तालुक्याचे सुपुत्र
डॉ. धोंडीभाऊ पुजारी हे पैठण तालुक्यातील खामजळगाव येथील रहिवासी असून त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयात पीएच.डी. केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्यासोबत १२ वर्षे ग्रामीण विकासावर काम केले. बाबांच्या निधनानंतर ते मूळ गावी परतले. स्वत:च्या ४२ एकर बागायती शेतीचा विकास केल्यानंतर मिळालेले उत्पन्न कितीतरी जास्त आहे. या उत्पन्नात समाजाचा वाटा आहे. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून त्यांनी पैठण तालुक्यातील शेतकºयांचे शिवार रस्ते, पाणंद रस्ते, शेततळे स्वखर्चातून करून देण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी स्वत: एक पोकलेन खरेदी केले. गेल्या दोन वर्षात तालुक्यातील ६७ गावात त्यांनी लाखो रुपये खर्च करून समाजसेवा सुरू केली. हे करत असताना कुठली जाहिरात नाही की उद्घाटन नाही. डॉ धोंडीभाऊ पुजारी यांनी वनस्पतीवर संशोधन करून कॅन्सरचे औषध शोधले असून मोफत कॅन्सर रूग्णावर ते मोफत उपचार करत आहेत. रूग्णाच्या घरी जाऊन ते औषध देत आले आहेत. रोज १५ ते २० रूग्णांना औषध त्यांच्याकडून दिले जाते. समाज कार्य करत असताना कायदेशीर अडचणी येत असल्यामुळे त्यांनी नुकतीच समाजभान कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान नावाच्या सेवाभावी संस्थेची नोंदणी केली आहे.
कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा मानस
पैठण शहर व परिसरात केटो सायक्लीनचे प्रमाण ७९ टक्के एवढे वाढलेले आहे. १२ टक्क्यांपर्यंत केटो सायक्लीनचे प्रमाण घटविण्याचा उद्देश डोळ्यासमोर आहे. यामुळे परिसरातील वेड्याबाभळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल, असे डॉ. धोंडिभाऊ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
पुढील टप्प्यात तालुक्यात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
पैठण शहरात आज शुभारंभ
डॉ. पुजारी यांनी आज शहरात स्वखर्चाने शहर स्वच्छता अभियान सुरू केले असून या स्वच्छतेसाठी आठ जेसीबी यंत्र कार्यान्वित करण्यात आले. मंगळवारी नगराध्यक्ष सूरज लोळगे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या हस्ते या स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक आबा बरकसे, कल्याण भुकेले, सुनील रासणे, दिलीप मगर, सतीश पल्लोड, महेश जोशी, जालींदर आडसूळ, तुषार पाटील, सुनील रासने, प्रा. संतोष गव्हाणे आदी उपस्थित होते.
पैठण शहराला केटो सायक्लिनचा धोका
पैठण शहराला वेड्याबाभळीचा वेढा पडला असून या वेड्याबाभळी केटो सायक्लीन वायूचे उत्सर्जन करतात. पैठण शहर व परिसरात केटो सायक्लिनचे प्रमाण ७९ टक्के एवढे वाढलेले आहे. हा वायू श्वासोच्छवासाद्वारे शरीरात गेल्यास कॅन्सर होण्याची शक्यता बळावत असल्याने पैठण शहर व परिसरातील वेड्याबाभळी पाहून मन अस्वस्थ झाले होते. सामाजिक आरोग्याचा हा गंभीर प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत पैठण शहरात स्वखर्चातून स्वच्छतेचा उपक्रम राबविण्याचा संकल्प दोन दिवसांपूर्वी केला. याबाबत माजी नगरसेवक सुनील रासणे व दिलीप मगर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्यामुळे शहरात यंत्रणा घेऊन दाखल झालो, असे पुजारी यांनी सांगितले.