विद्यापीठाच्या 'पेट' ची प्रतीक्षा; ३,१६४ विद्यार्थ्यांना मिळू शकते पीएचडी संशोधनाची संधी
By योगेश पायघन | Published: March 4, 2023 07:32 AM2023-03-04T07:32:06+5:302023-03-04T07:35:01+5:30
दोन वर्षांपूर्वी झाली होती परीक्षा,राज्यात सर्वाधिक विद्यार्थी विद्यापीठात संशोधन करत आहे.
- योगेश पायघन
छत्रपती संभाजीनगर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जानेवारी आणि मार्च २०२१ नंतर पीएच.डी प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) पार पडली. सध्या १७८ संशोधन केंद्रावर सात हजार ७४४ विद्यार्थी संशोधन करत आहेत. तर अजूनही १,६४० गाईड्सकडे ३,१६४ विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी आहेत. मात्र, दोन वर्ष सरले अद्याप पेट परीक्षेच्या हालचाली नाहीत. त्यामुळे पीएच.डी संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेट परीक्षा घ्या, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून जोर धरत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. एन्ट्रन्स टेस्ट (पेट पेपर पहिला व दुसरा) जानेवारी व मार्च २०२१ महिन्यात घेण्यात आली होती. ४५ विषयांसाठी झालेल्या पेट परीक्षेत चार हजार २९९ पात्र ठरले होते. पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र सेट, नेट, एम.फिल आदी विद्यार्थ्यांची सप्टेंबर २०२१ मध्ये संशोधन अधिमान्यता समितीने (आरआरसी) समोर सादरीकरण झाले. तर प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात करण्यास जानेवारी २०२२ उजाडला. सध्या सात हजार ७४४ विद्यार्थ्यांची पीएच.डी. संशोधनासाठी सध्या नोंदणी आहे. राज्यात सर्वाधिक विद्यार्थी विद्यापीठात संशोधन करत आहे.
कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी कालमर्यादेत संशोधन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विद्यापीठाने स्वत:चे साॅफ्टवेअर युनिककडून विकसित करून घेतले. प्रत्येक संशोधनाची अपडेट स्थिती त्याद्वारे कळत आहे. त्याशिवाय बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. शहरात ५८ तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९३ संशोधन केंद्र आहेत. त्यापैकी ४४ केंद्र विद्यापीठातील विभागात आहेत. बीडमध्ये ४१, जालना जिल्ह्यात ३०, धाराशिव येथे १४ असे एकूण १७८ संशोधन केंद्रांवर सध्या १,६४० गाईडच्या मार्गदर्शनात संशोधन सुरू आहे.
आढाव्याला सुरुवात... नव्या नियमानुसार होईल पेट
युजीसीच्या नव्या नियमानुसार पीएच.डी संशोधनासाठी विद्यापीठाचे नवे नियम तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही विषयांच्या अडचणी होत्या त्या दूर केल्या. विभागनिहाय पीएच.डीचा आढावा सुरू केला आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच नव्या नियमानुसार पुढील पेट परीक्षा घेतली जाईल.
- डाॅ. श्याम शिरसाठ, प्रकुलगुरू, डाॅ. बा.आं.म.वि. छत्रपती संभाजीनगर
विद्यापीठ कार्यक्षेतालील पीएच.डी संशोधन स्थिती
शाखा - गाईड- संशोधक नोंदणी- पूर्णवेळ- अर्थवेळ- रिक्त जागा
विज्ञान व तंत्रज्ञान- ५२२ - २५०९ - १,५६९ - ९४० - १,१८२
आंतरविद्याशाखीय अभ्यास - १९३ - १,१४४ - ७७१ - ३७३ - २൦२
मानव्यविद्या - ८१४ - ३,३७४ - २,४८८ - ८८६ - १,६११
वाणिज्य व व्यवस्थापन - १११ - ७१७ - ५२८ - १८९ - १७४