औंढा नागनाथ येथील वन समितीला पुरस्कार
By Admin | Published: August 24, 2014 11:36 PM2014-08-24T23:36:47+5:302014-08-24T23:54:00+5:30
औंढा नागनाथ : येथील वन व्यवस्थापन समितीला संत तुकाराम वनग्राम तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
औंढा नागनाथ : येथील वन व्यवस्थापन समितीला राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा संत तुकाराम वनग्राम तृतीय पुरस्कार २३ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील कुंडल वनअकादमी येथे प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंगोलीचे विभागीय वन अधिकारी चंद्रशेखर सरोदे, औंढा पश्चिम परिक्षेत्राचे अधिकारी डी. एस. खुपसे, एन. व्ही. वाळके, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माणिकराव पाटील, सचिव एस. एस. दोडके व समिती सदस्यांनी हा पुरस्कार स्विकारला. वन विभागाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. औंढा नागनाथ वन परिक्षेत्र पश्चिम अंतर्गत वन व्यवस्थापन समितीने सन २०१२-१३ मध्ये जलसंधारण, वृक्ष लागवड, वृक्षतोड बंदी, पर्यटन, अतिक्रमण हटाव अशा १ ते १७ मुद्यानुसार उत्कृष्ट कार्य केल्यामुळे पुरस्कारासाठी या समितीची शिफारस जिल्हा वन समितीने राज्य शासनाकडे केली होती. त्या अनुषंगाने राज्यातून तृतीय क्रमांकाचा हा पुरस्कार असून त्याचे स्वरूप ३ लाख रोख व मानचिन्ह असे आहे. (वार्ताहर)