सोहळे यशस्वी करणाऱ्या पडद्यामागच्या हातांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:03 AM2021-09-03T04:03:21+5:302021-09-03T04:03:21+5:30
औरंगाबाद : घरातील मंगल कार्यापासून ते मोठ्या शासकीय कार्यक्रमापर्यंत सर्व सोहळे यशस्वी पार पाडणारे; पण कधीच जगासमोर न ...
औरंगाबाद : घरातील मंगल कार्यापासून ते मोठ्या शासकीय कार्यक्रमापर्यंत सर्व सोहळे यशस्वी पार पाडणारे; पण कधीच जगासमोर न येणारे अनेक अदृश्य हात असतात. त्यातील सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या मराठवाड्यातील ८ इव्हेंट एजन्सींच्या संचालकांना ‘लोकमत इव्हेंट एक्सलंस अवॉर्ड’ प्रदान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. या पुरस्काराने आमची जबाबदारी वाढली आहे. आणखी उत्कृष्ट नियोजन करून आम्हाला भविष्यातील सोहळे यशस्वी करण्यासाठी पुरस्काराने बळ दिले, अशा शब्दांत पुरस्कारप्राप्त संचालकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
लोकमतच्या वतीने बुधवारी (दि. १) ‘लोकमत इव्हेंट एक्सलंस अवॉर्ड’ सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या साक्षीदार ठरल्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व अभिनेत्री आदिती सारंगधर. मागील काही वर्षांत इव्हेंट मॅनेजमेंटला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या एजन्सीशिवाय आता लहान असो वा मोठे सोहळे यशस्वी करणे ही कल्पनाच करू शकत नाही. मग ते मंडप एजन्सी असो वा फोटोग्राफर, व्हिडिओ शूटिंग, स्टेज डेकोरेशन, एलईडी वॉल, लायटिंग, साउंड सिस्टिम, केटरिंग असे अनेक व्यावसायिक तसेच इव्हेंट एजन्सीमधील शेकडो हात सोहळ्याच्या यशस्वितेसाठी रात्रंदिवस राबत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत ‘लोकमत इव्हेंट एक्सलंस अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात इव्हेंट एजन्सीचे संचालक कुटुंबीयांसह आले होते. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व अभिनेत्री आदिती सारंगधर यांच्या हस्ते ‘ट्रॉफी व कॉफी टेबल बुक’ प्रदान करण्यात आले.
----
कॅप्शन
लोकमत इव्हेंट एक्सलंस अवॉर्ड सोहळ्यात (मध्यभागी) पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व अभिनेत्री आदिती सारंगधर. पुरस्कार प्राप्त इव्हेंट एजन्सीच्या संचालक (डावीकडून) शेखर कातनेश्वरकर (कॅची इव्हेंट), नीलेश सातोनकर (मल्टिमीडिया इव्हेंट ॲण्ड एक्झिबिशन), हर्ष जयपुरीया (मधुर वास्तू भंडार), मनोज बोरा (सिद्धी डेकोरेटर), नितीन मुगदिया (नम्रता कॅटरर्स), राहुल बोधनकर (बोधनकर इव्हेंट एलएलपी), प्रमोद सरकटे, स्वराज सरकटे (स्वराज संगीत), संदीप काळे (संदीप साउंड) मुकेश तिवारी, आस्था तिवारी (मीडिया हाऊस).
----
कॅप्शन
लोकमत वूमन ॲचिव्हर्स अवॉर्डसच्या प्रारंभी, आरती क्रिएशन ॲण्ड ग्रुपमधील कलाकारांनी गणेश वंदना सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.