भयंकर ! मोकाट कुत्र्यांनी वर्षभरात ५ हजार नागरिकांचे लचके तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 07:31 PM2020-12-19T19:31:12+5:302020-12-19T19:33:18+5:30
महापालिका मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करायला तयार नाही.
औरंगाबाद : जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांत शहरात पाच हजारांपेक्षा अधिक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. गुरुवारी कटकट गेट भागातील युनूस कॉलनी येथे मोकाट कुत्र्यांनी लहान मुलाचे लचके तोडले. अशा परिस्थितीत महापालिका मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करायला तयार नाही.
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या पन्नास हजारांपेक्षा अधिक झाली आहे. दररोज किमान दहा ते पंधरा नागरिकांना मोकाट कुत्रे चावा घेतात. मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांना टार्गेट केले आहे. मोकाट कुत्र्याने चावा घेतल्यानंतर महापालिकेच्या एकाही दवाखान्यात रेबीजची लस उपलब्ध होत नाही. सर्व नागरिकांना घाटी रुग्णालयातच धाव घ्यावी लागते. शहरातील नागरिकांना आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी महापालिकेवर असली तरीही कुत्रा चावल्यानंतर नागरिकांना नाईलाजाने घाटी रुग्णालयातच धाव घ्यावी लागते.
जानेवारी ते डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घाटी रुग्णालयात कुत्रा चावल्यानंतर ५ हजार ३४८ नागरिकांवर उपचार करण्यात आले. यामुळे दिवसेंदिवस घाटी रुग्णालयावरील ताण वाढत आहे. शहरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक कमालीचे वैतागले आहेत. घराच्या आसपास लहान मुलांना खेळायला सोडणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखा प्रकार होत आहे. पालकांकडून या घटनेबाबत चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महापालिकेकडून खाजगी एजन्सीच्या सहकार्याने मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.
रात्री नागरिकांना वाहन चालविणे अवघड
मध्यवर्ती जकात नाका, पुंडलिकनगर, बायजीपुरा, औरंगपुरा भाजी मंडई, बारुदगर नाला, जळगाव रोड अशा वेगवेगळ्या भागांत मोकाट कुत्र्यांचे साम्राज्य आहे. रात्री १२ वाजेनंतर नागरिकांना वाहन चालविणे अवघड जाते. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून जातात.
कुत्र्यांची पिल्ले दत्तक देण्याचा उपक्रम
महापालिकेकडून सध्या कुत्र्यांची पिल्ले दत्तक देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मागील दोन ते तीन महिन्यांत जवळपास दोनशे कुत्रे दत्तक देण्यात आले. पडेगाव भागात कुत्र्यांवर नसबंदी करण्यासाठी अद्ययावत दवाखाना उघडण्यात येत असल्याची माहिती डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी दिली.