ऐन दिवाळीच्या तोंडावर बेकारीची कुऱ्हाड; थकीत वेतन देण्याऐवजी ‘सिव्हिल’च्या ५२ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 02:35 PM2020-11-06T14:35:36+5:302020-11-06T14:47:14+5:30
स्वच्छतेसह रुग्णसेवेसंबंधी अनेक जबाबदारी ते पार पाडत होते.
औरंगाबाद : तब्बल ३ महिन्यांचे थकलेले वेतन आज ना उद्या होईल, या आशेवर जिल्हा रुग्णालयात ५२ स्वच्छता कर्मचारी कोरोना काळात अविरतपणे सेवा देत होते. परंतु थकीत वेतन देण्याऐवजी या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात एप्रिलपासून केवळ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. याठिकाणी रुग्णसंख्या वाढल्याने कर्मचारी अपुरे पडत होते. त्यामुळे रोजंदारी तत्त्वावर स्वच्छता सेवक घेण्यात आले. गेल्या ७ महिन्यांपासून हे कर्मचारी याठिकाणी काम करीत होते. स्वच्छतेसह रुग्णसेवेसंबंधी अनेक जबाबदारी ते पार पाडत होते. ३ महिन्यांचे वेतन मिळाले. परंतु त्यानंतर एक महिना गेला, दुसरा गेला तरीही त्यांचे वेतन झाले नाही. तिसरा महिनाही वेतनाविना गेला. आज ना उद्या वेतन मिळेल, या आशेवर कर्मचारी काम करीत राहिले.
परंतु बुधवारी या कर्मचाऱ्यांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अडविण्यात आले. रोजंदारीवरील सेवा समाप्त केल्याचे सांगण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी एकत्र येऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांची भेट घेत वेतन देण्याची आणि पुन्हा कामावर घेण्याची मागणी केली. याविषयी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर म्हणाले, कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाईल. मान्यता मिळाल्यास या कर्मचाऱ्यांना परत घेतले जाईल.
अनुदान उपलब्ध नसल्याचे कारण
रोजंदारी तत्त्वावरील सेवेसाठी एनएचएम अंतर्गत अनुदान प्राप्त होणार नाही. तसेच ‘मजुरी’ या शीर्षअंतर्गत अनुदानही सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे सेवा घेणे अशक्य असल्याचे रुग्णालयात या कर्मचाऱ्यांसाठी लावलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.