सिल्लोडमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरकडून राजरोस सुरू होती भ्रूणहत्या; शेतात पुरायचे मृतदेह
By सुमित डोळे | Published: May 18, 2024 12:04 PM2024-05-18T12:04:38+5:302024-05-18T12:05:10+5:30
सिल्लोड पोलिस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर हे संतापजनक कृत्य सुरू होते.
छत्रपती संभाजीनगर/सिल्लोड : दोन वर्षांपासून सिल्लोडच्या जय भवानीनगरमध्ये प्रसुतीगृह व स्त्रीरोग रुग्णालयाच्या नावाखाली आयुर्वेदिक डॉ. रोशन शांतीलाल ढाकरे हा राजरोस अर्भकांची पोटातच हत्या करत करत होता. सिल्लोड पोलिस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर हे संतापजनक कृत्य सुरू होते. मात्र, प्रशासनाच्या एकाही विभागाला ही बाब कळू शकली नाही, हे विशेष. गारखेड्यात अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे ढाकरेपर्यंत पोहोचल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले. ढाकरेसह त्याला मदत करणाऱ्या चार कंपाैंडरांना अटक करण्यात आली. जिल्हाभरात १५ ते २० एजंटांचे जाळे पसरल्याचेही पोलिसांनी सांगितले.
रविवारी गारखेड्यातील अनधिकृत गर्भलिंग निदान केंद्र उघडकीस आले. चौकशीत आरोपींकडून गर्भलिंग निदानानंतर गर्भपातासाठी ढाकरेकडे पाठविले जात असल्याचे उघडकीस आले. उपायुक्त नवनीत काँवत यांच्या सूचनेवरून निरीक्षक यादव यांनी उपनिरीक्षक आनंद बनसोडे, विद्या पवार, बाबू राठोड, सुनील म्हस्के यांच्यासह गुरुवारी ढाकरेच्या रुग्णालयावर धाड टाकण्याचे नियोजन केले.
दारूची पार्टी रंगात असतानाच...
पोलिस गुरुवारी सकाळीच श्री रुग्णालयाजवळ पोहोचले. सविता पकडली जाताच ढाकरेने रुग्णालयाचा बोर्ड काढून, रुग्णालयातील संगणक, शस्त्रक्रियेचे साहित्य, बेड, अन्य सर्व साहित्य हलवून रुग्णालय रिकामे केले होते. अंमलदार दीपक देशमुख, गणेश डोईफोडे, दीपक जाधव, कल्याण निकम, संदीप बिडकर यांनी इमारतीचा दुसरा मजल्यावरील दरवाजा तोडला. तेव्हा आत ढाकरे गोपाल कळांत्रे (रा. सिल्लोड) याच्या वाढदिवसानिमित्त दारूची पार्टी करत असतानाच दोघांच्या मुसक्या आवळल्या. ढाकरेला गर्भपातात मदत करणाऱ्या अन्य कंपाैंडरचा दुसरे पथक शोध घेत होते. अंमलदार राजेश यदमळ, प्रशांत नरवडे, विक्रम खंडागळे, दीपकसिंग यांनी दुसरा कंपाैंडर नारायण पंडित (रा. बाजारसावंगी) ला ताब्यात घेतले. ढाकरेने तो मूळव्याधीचा डॉक्टर असल्याचे सांगून हात झटकले. दुसरीकडे पंडितने मात्र ९ मे रोजीच ढाकरेच्या सांगण्यावरून एक अर्भक त्याच्या शेतात पुरल्याची कबुली दिली आणि पोलिसही थक्क झाले. यादव यांनी तत्काळ रात्री पंडितचे शेत गाठले. तहसीलदार, आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेले अर्भकाचे अवशेष काढले. ढाकरे धारदार ब्लेडच्या वापराने गर्भ बाहेर काढत होता. चार तासांमध्ये गर्भपात करून महिलेला सोडले जायचे. मृतदेह आसपासच्या शेतात पुरायचे.
भुसावळला शिक्षण
डॉ. रोशनचे कुटुंब मूळ अंभई येथील आहे. त्याने भुसावळ येथून बीएएमएसची पदवी घेऊन काही काळ आयुर्वेदिकची प्रॅक्टिस केली. त्याची पत्नीदेखील डॉक्टर असून वर्षभरापासून त्यांच्यात वाद सुरू झाल्याने माहेरी राहते.
पोलिस आणखी एजंटच्या शोधात
रविवारच्या कारवाईचे वृत्त प्रसिद्ध होताच सोमवारी ढाकरेसह अन्य एजंटांना व्हॉट्स ॲपवर लपून बसण्याचा सल्ला दिला गेला. त्यांच्या संपर्कातील अनेकांचे मोबाइल स्वीच ऑफ आहेत. पोलिस ८ ते १० एजंटांच्या शोधात असल्याचे निरीक्षक यादव यांनी सांगितले. साक्षी, सविता, ढाकरेसह सर्व आरोपींना न्यायालयाने २० मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
परवाना नाहीच
डॉ. ढाकरेकडे कुठलाही शासनमान्य गर्भपात केंद्राचा परवाना नाही. परवानाधारकांची दर महिन्याला तपासणी होते. आम्हाला ढाकरेच्या गर्भपात केंद्राची कल्पना नव्हती.
- महेश विसपुते, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, सिल्लोड.
काळीमा फासणारी घटना
सिल्लोडमध्ये सुरू असलेल्या या क्रूर कृत्याची कल्पना आम्हालाही नव्हती. ढाकरेचे हे कृत्य वैद्यकीय व्यवसायाला काळिमा फासणारे आहे.
- डॉ. नीलेश मिरकर, अध्यक्ष, धन्वंतरी डॉक्टर असोसिएशन, सिल्लोड.