‘अन्यथा, आयकरच्या धाडी टाकू’, महावितरण अभियंत्याला धमकीची क्लिप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 02:54 PM2022-03-31T14:54:06+5:302022-03-31T14:55:52+5:30

औरंगाबादच्या सातारा परिसरातील महावितरणचे सहायक अभियंता काळे यांच्याशी फोनवर आ. लोणीकर यांनी संपर्क साधून मीटर काढून नेल्यासंदर्भात विचारणा करणारी ही ऑडिओ क्लिप बुधवारी व्हायरल झाली.

Babanrao Lonikar warn to leader for Income Tax department | ‘अन्यथा, आयकरच्या धाडी टाकू’, महावितरण अभियंत्याला धमकीची क्लिप व्हायरल

‘अन्यथा, आयकरच्या धाडी टाकू’, महावितरण अभियंत्याला धमकीची क्लिप व्हायरल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क   
औरंगाबाद : नोटीस न देता थकीत वीज बिलांसाठी मीटर काढून नेल्याचा आरोप करत भाजप आ. बबनराव लोणीकर यांनी ‘महावितरण’च्या सहायक अभियंत्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. आ. लोणीकर यांनी ‘आमच्या नादी लागू नका’, असे म्हणत अभियंत्यास आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकीदेखील यात दिली आहे. ‘हिंमत असेल तर झोपडपट्टीत जा, तेथे आकडे टाकणाऱ्यांची वीज तोड. ऊर्जामंत्री माझे जवळचे नातेवाईक आहेत. एका मिनिटात सस्पेंड करून टाकेन’, असेही आ. लोणीकर यात म्हणाले.   

औरंगाबादच्या सातारा परिसरातील महावितरणचे सहायक अभियंता काळे यांच्याशी फोनवर आ. लोणीकर यांनी संपर्क साधून मीटर काढून नेल्यासंदर्भात विचारणा करणारी ही ऑडिओ क्लिप बुधवारी व्हायरल झाली. सातारा परिसरात लोणीकर यांचा बंगला आहे. त्याचे वीज बिल थकीत आहे. वसुलीसाठी लोणीकर यांच्या घराच्या अनेक चकरा मारल्या, मुलासोबत बोलणे झाले तरीही बिल भरले नाही, असे  महावितरणचे सहायक अभियंता फोनवरून लोणीकर यांना सांगतात. मात्र, नोटीस न देता वीज मीटर कसे काय काढून नेले, याचा जाब विचारत  लोणीकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर संवाद साधल्याचे क्लिपमधून ऐकण्यात येते. परंतु, अभियंता मीटर काढून नेले नाही, असे वारंवार सांगतात. यावरही आ. लोणीकर अभियंत्याला, ‘तुम्हाला  अक्कल पाहिजे? माज चढला का? एका मिनिटात घरी पाठवेन’, असे सुनावतात.  मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्याशी संपर्क साधला असता, क्लिप ऐकण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. सदर सहायक अभियंत्यांचा फोन बंद असल्यामुळे त्यांची बाजू कळू शकली नाही.    

कारवाई करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश
औरंगाबाद :  माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल डॉ. राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त  करीत लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश त्यांनी औरंगाबाद येथील महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत.

मला बदनाम करण्याचा कट 
वीज वितरण कंपनीच्या आडून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात असून, मी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावलेला नाही आणि माझे कुठलेही मीटर वीज वितरण कंपनीने काढून नेलेले नाही. माझा औरंगाबादेत बंगला आहे, परंतु त्या बंगल्यावरील मीटर काढून नेले नाही, हा तर मला बदनाम करण्याचा कट आहे.     - बबनराव लोणीकर, आमदार, भाजप

Web Title: Babanrao Lonikar warn to leader for Income Tax department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.