समाजव्यवस्थेतील प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर: न्यायाधीश के. चंद्रू
By विजय सरवदे | Published: April 1, 2023 11:58 AM2023-04-01T11:58:41+5:302023-04-01T11:59:09+5:30
नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्यावतीने आयोजित तीनदिवसीय नागसेन फेस्टिव्हलचे उद्घाटन न्यायाधीश के. चंद्रू यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले.
छत्रपती संभाजीनगर :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेपेक्षा त्यांच्या इतर साहित्यातून भारतीय समाजाच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. घटना लिहिताना मर्यादा असल्यामुळे त्यांना पूर्णपणे व्यक्त होता आले नव्हते. भारतीय समाजव्यवस्थेतील प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही एकमेव व्यक्ती आहे, असे प्रतिपादन ‘जयभीम’ चित्रपटाचे प्रणेते तथा मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. चंद्रू यांनी केले.
नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्यावतीने आयोजित तीनदिवसीय नागसेन फेस्टिव्हलचे उद्घाटन न्यायाधीश के. चंद्रू यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट अभिनेते किशोर कदम (सौमित्र) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठीतून सिद्धार्थ मोकळे यांनी, तर इंग्रजीतून डॉ. उत्तम अंभोरे यांनी केले. चंद्रू यांचा परिचयही डॉ. अंभोरे यांनी करून दिला.
यावेळी न्यायाधीश चंद्रू म्हणाले, १९७५ साली आणीबाणीच्या काळात आणि आताच्या काळात माध्यमावर असलेली बंधने सारखीच आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी बाहेर येत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांनी बाबासाहेबांचा विचार समजून घेतला पाहिजे. आता सध्या अमेरिकेमध्ये जातीवादाचा प्रश्न उद्भवला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३० च्या दशकातच याबद्दल सूतोवाच केले होते की, भारतीय माणूस जेथे जेथे जाईल, तेथे जातीचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे अशा व्यवस्थेविरुध्द आपणास सजगपणे आवाज उठविणे गरजेचे आहे.
चित्रपटाचा समाजमनावर परिणाम
यावेळी ‘चित्रपटातील समाज वास्तव आणि वास्तवातील समाजमन’ या विषयावर किशोर कदम यांनी मनोगत व्यक्त केले. व्यावसायिक आणि वास्तववादी चित्रपटाचे हे दोन प्रकार आहेत. केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर प्रबोधनासाठीही चित्रपट असतात. समाजामध्ये वास्तवात जे घडते, ते चित्रपटातून दाखविले जाते. चित्रपटाचा समाजमनावर परिणाम होत असतो. अलीकडे जातीय व्यवस्थेवर चित्रपटातून कथानक दाखविले जाते, असे सांगून आतापर्यंत चित्रपटात केलेल्या भूमिका व राष्ट्रीय पुरस्काराची हुकलेली संधी यावर कदम यांनी भाष्य केले.
नागसेन गौरव पुरस्कार
यावेळी के. चंद्रू यांच्या हस्ते भदन्त विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांना धम्मचळवळीतील उल्लेखनीय कार्याबद्दल नागसेन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबत डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. तुषार मोरे, के. एम. बनकर, भीमराव सरवदे, ॲड. सुनील मगरे, ॲड. सी. एस. गवई, ॲड. सिद्धार्थ उबाळे, ॲड. नितीन मोने यांचा सत्कारही चंद्रू यांच्या हस्ते करण्यात आला.