बाबा, तुझ्या पाऊलखुणा शिक्षणासाठी दिशादर्शक; महामानव अन् छत्रपती संभाजीनगरचे अतूट नाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 19:52 IST2024-12-06T19:52:05+5:302024-12-06T19:52:24+5:30

महापरिनिर्वाण दिन विशेष: नागसेवन परिसरात १९५० साली मिलिंद महाविद्यालय सुरू झाले. बाबासाहेबांच्या निगराणीखाली या महाविद्यालयाची इमारत, वसतिगृहाची इमारत उभारली गेली. त्यासाठी ते या शहरात सन १९४५ ते १९५६ पर्यंत सतत यायचे व अनेक दिवस त्यांचा येथे मुक्काम असायचा.

Babasaheb Ambedkar, your footsteps are the guide for education; Mahamanav and Chhatrapati Sambhajinagar had an unbreakable relationship | बाबा, तुझ्या पाऊलखुणा शिक्षणासाठी दिशादर्शक; महामानव अन् छत्रपती संभाजीनगरचे अतूट नाते

बाबा, तुझ्या पाऊलखुणा शिक्षणासाठी दिशादर्शक; महामानव अन् छत्रपती संभाजीनगरचे अतूट नाते

छत्रपती संभाजीनगर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि या शहराचे नाते अतुट आहे. मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करण्यापूर्वी देखील बाबासाहेब अनेकदा या शहरात येऊन गेले. या प्रदेशातील समाजाची दयनीय अवस्था आणि उच्चशिक्षणाची असुविधा बाबासाहेबांना अस्वस्थ करणारी होती. म्हणूनच त्यांनी येथे मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करून उच्चशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या शहराला लाभलेला त्यांचा पदस्पर्श मागील तीन पिढ्यांपासून दिशादर्शकच ठरला आहे.

नागसेवन परिसरात १९५० साली मिलिंद महाविद्यालय सुरू झाले. बाबासाहेबांच्या निगराणीखाली या महाविद्यालयाची इमारत, वसतिगृहाची इमारत उभारली गेली. त्यासाठी ते या शहरात सन १९४५ ते १९५६ पर्यंत सतत यायचे व अनेक दिवस त्यांचा येथे मुक्काम असायचा. सुरुवातीला छावणीतील बंगला क्रमांक ९ मध्ये त्यांचे वास्तव्य होते. त्यावेळी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात येत असताना छावणीत ते ज्या बंगल्यात राहायचे, त्याच्या बाजूलाच बंगला क्रमांक ७ व ८ मध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या तासिका चालायच्या. तेथेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची देखील सोय होती. मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे ‘अजिंठा’ हाॅस्टेल, मिलिंद कला महाविद्यालयाचे राउंड हाॅस्टेल व मिलिंद हायस्कूल या इमारतीचे प्लॅन कोणा वास्तूशास्त्रज्ञाचे नव्हे तर स्वत: बाबासाहेबांनीच तयार केले होते. पहिल्या बॅचपासून आज तिसरी पिढी नागसेवनातील शैक्षणिक संकुलांमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडली असून देशात विविध सर्वोच्च पदांवर कार्यरत आहे.

आजही छावणीतील बंगला क्रमांक ९ असेल, बंगला क्रमांक ७ व ८ असेल. याशिवाय मिलिंद महाविद्यालयातील त्यांच्या वापरात असलेल्या खुर्ची, विविध काठ्या, पलंग, गादी, टॉवेल्स, जेवणाची भांडी, महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये बाबासाहेबांनी हाताळलेले अनेक ग्रंथ, ज्यात त्यांनी अनेक पानांवर पेन्सिलने अधोरेखीत केलेेले दिसून येत आहे. ज्ञानज्योत तेवत ठेवणाऱ्या बाबासाहेबांच्या आठवणींचा हा दुर्मीळ ठेवा आजही तरुणांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणा देणारा आहे.

छावणीतील ७,८ व ९ या क्रमांकांच्या बंगल्यांची आठवण
स्वत: बाबासाहेबांनी आपल्या देखरेखीत उभारलेल्या मिलिंद महाविद्यालयास ऐतिहासिक महत्त्व आहे. या इमारतीला प्राचीन वारसा स्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी महाविद्यालय प्रशासनाने शासनाकडे केली आहे, तर दुसरीकडे, छावणीतील ७,८ व ९ या क्रमांकांच्या बंगल्यांची आठवण पुढील पिढीला मार्गदर्शक राहील, यासाठी या परिसरात बाबासाहेबांचे स्मारक उभारावे, अशी मागणी शहरातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडे केली. कारण, ही जागा केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या ताब्यात आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या मागण्यांना उजाळा देण्याचा हा प्रयत्न.

Web Title: Babasaheb Ambedkar, your footsteps are the guide for education; Mahamanav and Chhatrapati Sambhajinagar had an unbreakable relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.