बाबासाहेबांनी दिला स्वाभिमान, विद्रोहाचा मंत्र
By | Published: December 7, 2020 04:00 AM2020-12-07T04:00:16+5:302020-12-07T04:00:16+5:30
औरंगाबाद : हजारो वर्षे अंधारात खितपत पडलेल्या वंचित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्रोह अन् स्वाभिमानाचा मंत्र दिला. बाबासाहेबांचे ...
औरंगाबाद : हजारो वर्षे अंधारात खितपत पडलेल्या वंचित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्रोह अन् स्वाभिमानाचा मंत्र दिला. बाबासाहेबांचे कार्यकर्तृत्व, त्यांचा वैचारिक वारसा, तसेच मोठेपण जलसा, कविता व गाण्यांतून समजला, असे प्रतिपादन प्रख्यात कवी डॉ. महेंद्र भवरे यांनी केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन व ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठ परिसरातील बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा, तसेच महात्मा फुले यांच्या पुतळ्यास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य फुलचंद सलामपुरे यांच्यासह अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजीब खान, रासेयो संचालक डॉ. टी.आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचे प्राध्यापक, प्रख्यात कवी तथा समीक्षक
डॉ. महेंद्र भवरे यांचे ‘कवितेतील बाबासाहेब’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान झाले.
ते म्हणाले, बाबासाहेबांवर मोठ्या प्रमाणात कथा, कविता, कादंबरी, नाटक, गीते, जलसा, चित्रपट व वैचारिक लेखन झालेले आहे. या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लेखन तीन टप्प्यांत पाहता येते. सुरुवातीला आंबेडकर गीते, जलसा व काव्य निर्माण झाले. नंतर कथा, कादंबऱ्या व आत्मचरित्र, तर अखेरच्या टप्प्यात वैचारिक व प्रबोधनाचे साहित्य निर्माण झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचे प्रमाण अल्प, तसेच संवाद व दळणवळणाची माध्यमे कमी होती. त्यामुळे संवादाची मौखिक परंपरा यातूनच जनजागृती होत असे. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय ही मूल्ये मांडली. सामाजिक विषमतेच्या विरोधात बंड केले. एका बाजूला बाबासाहेबांचे हे जनजागृतीचे कार्य सुरू होते, तर त्याचवेळी दुसरीकडे जलसे, लोकगीतांतून बाबासाहेबांचे विचार गावोगावी पोहोचत होते. प्रारंभीच्या काळात वामनदादा कर्डक यांनी लोकगीतांतून बाबासाहेबांचा विचार गावोगावी पोहोचविला, तर ‘जग बदल घालूनी घाव, मज सांगून गेले भीमराव’ या शब्दांत अण्णाभाऊ साठे यांनी परिवर्तनाचे रणशिंग फुंकले. नामदेव ढसाळ, वामन निंबाळकर, भीमराव कर्डक, ज.वि. पवार, दया पवार, बाबूराव बागूल यांच्यापासून ते कुसुमाग्रज, अगदी फ.मुं. शिंदे यांच्यापर्यंत अनेकांनी कवितांमधून बाबासाहेबांचा विद्रोहाचा विचार मांडून समाजात जागृती केली. आज जगाच्या कानाकोपऱ्यात बाबासाहेबांचे विचार व कार्य पोहोचले असून, यात कवितेचे योगदान विसरता येणार नाही, असेही डॉ. भवरे म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, आधुनिक भारताच्या जडणघडणीत बाबासाहेबांचे योगदान अतुलनीय असून, त्यांच्या विचाराचा ध्यास युवकांनी घेतला पाहिजे. बाबासाहेबांना जगातील एक आदर्श विद्यार्थी म्हणून ओळखले जात असून, ते ज्ञानाचे प्रतीकदेखील आहेत. बाबासाहेबांच्या नावाला व विचारला साजेसे काम करून विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. इंग्रजी विभागप्रमुख डॉ. उत्तम अंभोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. मुस्तजीब खान यांनी प्रास्ताविक केले, तर संजय शिंदे यांनी आभार मानले.