बाबासाहेब आमची प्रेरणा : विद्यार्थ्यांवर मुलाप्रमाणे माया करायचे बाबासाहेब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 07:05 PM2019-04-14T19:05:49+5:302019-04-14T19:06:42+5:30
तू त्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय कर. जेवण कसे आहे, ते मी बघायला येईन.
'मिलिंद’च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी तथा विक्रीकर विभागाचे निवृत्त उपायुक्त वसंत धावरे यांनी बाबासाहेबांच्या काही आठवणी जाग्या केल्या.
बाबासाहेबांना मराठवाड्याच्या मागासलेपणाची कल्पना होती. या भागात विकोपाला गेलेली अस्पृशता, उच्चशिक्षणाचा मोठा अभाव असल्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी औरंगाबादेत त्यांनी महाविद्यालय सुरू केले. छावणीजवळ जवळपास १६९ एकर जागा घेतली. इमारत बांधण्यासाठी थोडा अवधी असल्यामुळे बाबासाहेबांनी छावणीतील मिलिटरीच्या रिकाम्या बॅरेक्समध्ये ‘पीईएस कॉलेज आॅफ आर्टस्, सायन्स अॅण्ड कॉमर्स’चे वर्ग सुरू केले. बाजूलाच प्राचार्य आणि प्राध्यापकांसाठीदेखील काही बराकी घेतल्या होत्या. माझे मावस मामा हे महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य होते. उस्मानाबाद येथील सरकारी हायस्कूलमधून १९५० साली मॅट्रिक पास झालो. ही बाब त्यांना समजली. त्यांनी मला पुढील शिक्षणासाठी ‘मिलिंद’मध्ये प्रवेश घेण्याचे सांगितले. त्यांनी प्राचार्य म.भि. चिटणीस सरांकडे शिफारस करणारे पत्र माझ्याजवळ दिले. ते पत्र घेऊन मी औरंगाबादला आलो.
माझी कौटुंबिक परिस्थिती तेव्हा चांगली होती. माझे वडील मगनराव धावरे हे सरकारी कंत्राटदार होते. घरी रेशन दुकानही होते. मी औरंगाबादला आल्यावर पीडब्ल्यूडी आॅफिसमध्ये गेलो. अगोदर याच कार्यालयात कार्यरत असलेले व नंतर ‘मिलिंद’मध्ये कार्यरत रुंजाजी भारसाखळे (पहिलवान) यांना भेटलो. तेथून आम्ही दोघे छावणीत आलो. महाविद्यालय सुरू होण्याअगोदर मराठवाड्यातील तीन- चार गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी आले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था जवळच्याच बराकीमध्ये करण्यात आली. त्यादिवशी त्या मुलांनी आणलेल्या भाकरी खाल्ल्या. मेसमध्ये जेवणासाठी मी दिसलो नाही, म्हणून चिटणीस सर माझ्या रूममध्ये आले.
मी त्यांना म्हणालो, अतिशय गरीब कुटुंबातील चार मुले कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आले आहेत. उद्यापासून आमची जेवणाची काय व्यवस्था आहे. तेव्हा चिटणीस सर म्हणाले, मला फक्त शैक्षणिक बाबतीत अधिकार आहेत. थोड्या वेळानंतर त्यांनी कॉलेजचे रजिस्ट्रार जी.टी. मेश्राम यांना भेटण्यासाठी आम्हाला नेले. तेव्हा तेथे ते चिटणीस सरांवरच ओरडले. हा त्यांचा व्यवहार मला जिव्हारी लागला. माझी ही अवस्था पाहून चिटणीस सर म्हणाले, बाबासाहेब येथेच आहेत. त्यांची भेट घालून देतो. ठरलेल्या वेळेनुसार आम्ही बाबासाहेबांना भेटण्यासाठी गेलो. बाबासाहेबांचे दर्शन घेऊन मी माझी ओळख करून दिली. मी म्हणालो, आम्हा विद्यार्थ्यांसाठी मेसची सोय करावी. शिष्यवृत्तीचे मिळणारे पैसे मेससाठी वजा करावेत. त्यांनी माझा पेन मागून घेतला व चिटणीस सरांकडून एक कागद. त्यावर मेससाठी अॅडव्हान्स पैसे मंजूर केल्याचे लिहिले.
पत्र माझ्याकडे दिल्यानंतर बाबासाहेब म्हणाले, पैसे मंजूर केले. तू त्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय कर. जेवण कसे आहे, ते मी बघायला येईन. बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांची सर्व जबाबदारी माझ्यावर सोपविली. १९५० ते १९५४ पर्यंत वसतिगृहाची सर्व व्यवस्था माझ्याकडेच देण्यात आली. माझ्या शैक्षणिक प्रगतीकडे बाबासाहेबांचे बारीक लक्ष असायचे. मी इंटर पास झाल्यावर बाबासाहेबांनी माझ्याबाबत चौकशी केली. माझ्या कुटुंबात कोणीच शाळेत गेलेले नसल्यामुळे विषयाची फारशी माहिती नव्हती. त्यामुळे मी बी.ए.साठी सोपे विषय घेतले होते. चिटणीस सरांनी माझा प्रवेश अर्ज मागवून घेतला व तो फाडून टाकला. दुसरा फॉर्म घेऊन त्यात अर्थशास्त्र हा विषय नमूद केला. मी अर्थशास्त्राची अडचण सांगितल्यावर प्रा. देशपांडे सरांकडून माझी तयारी करून घेतली. मी एलएल.बी. करावे, अशी बाबासाहेबांची इच्छा होती; पण मी हैदराबाद येथे एम.ए. करण्यासाठी गेलो.
बाबासाहेबांचा मधुमेह अधिकच बळावला होता. त्यांना चालण्याची गरज होती. एका बाजूला माईसाहेब आणि मी बाबासाहेबांच्या हाताला धरून चालत असे. आमच्या मागे रुंजाजी पहिलवान हे खुर्ची घेऊन चालायचे. चालण्याने दम लागला की, बाबासाहेब काही वेळ खुर्चीत बसायचे.
( संकलन : विजय सरवदे )