बाबासाहेब आमची प्रेरणा : बाबासाहेबांचा दरारा, पण आदरयुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 06:51 PM2019-04-14T18:51:46+5:302019-04-14T18:52:17+5:30
बाबासाहेबांना आम्ही दुरूनच पाहायचो. जवळ जाण्याची कोणाचीच हिंमत नसायची.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे हे देखील मिलिंदचेच विद्यार्थी. त्यांनी विद्यार्थीदशेतील काही आठवणी जाग्या के ल्या. ते म्हणतात, मी १९५५ मध्ये जिंतूर येथे दहावी पास झालो. आमचे हायस्कूल नवीनच होते. शाळेची आमची तिसरी बॅच होती. दहावीच्या बॅचमध्ये ३० विद्यार्थी होतो. त्यापैकी आम्ही ९ विद्यार्थीच पास झालो. पुढील शिक्षणासाठी कुठल्या कॉलेजला जायचे याबद्दल आमची चर्चा झाली. मात्र, पास झालेल्या ९ विद्यार्थ्यांपैकी मी एकटाच औरंगाबादला राहिलो व बाकीचे हैदराबादला गेले. १९४८ साली हैदराबाद राज्य विलीन झाल्यानंतर जिंतूर हायस्कूलमध्ये अनेक मराठी शिक्षक आले होते. त्यांच्याकडून बाबासाहेबांसारख्या विद्वान माणसाने सुरू केलेल्या कॉलेजबद्दल खूप ऐकले होते. या कॉलेजची गुणवत्ता, ग्रंथालय, खेळ आणि तज्ज्ञ प्राध्यापकांमुळे माहिती होती. या कॉलेजमध्ये सर्व जाती-धर्मांची मुले शिक्षण घेत होती. या महाविद्यालयातूनच साहित्य, संस्कृती, नाट्य चळवळी जन्माला आल्या.
१९५५ मध्ये इंटर आर्टला मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेव्हा नेमके नवीन इमारतीमध्ये वर्ग सुरू झाले. ओलसर भिंती होत्या. महाविद्यालयात शिकविण्यासाठी बाबासाहेबांनी वेगवेगळ्या प्रांतातून निवडक अनुभवी प्राध्यापक आणले होते. सुदैवाने त्याच वर्षी वसतिगृहात बोर्डिंगही सुरू झाली होती. बोर्डिंगमध्ये बाबासाहेबांची दोन-तीन भाषणे झाली. विद्यार्थ्यांचे राहणीमान कसे असावे, अभ्यास, वाचन, मनन, चिंतन करावे, तर्काने विचार करावा, असा उपदेश बाबासाहेब करायचे. त्यामुळेच या कॉलेजचा विद्यार्थी ‘मिलिंद’सारखा व प्राध्यापक ‘नागसेन’सारखे व्हावेत, अशी इच्छा बाबासाहेबांची होती. योगायोगाने मी प्रवेश घेतला त्याचवर्षी या महाविद्यालयाचे मिलिंद व परिसराला ‘नागसेनवन परिसर’ असे नाव दिले.
बाबासाहेब शिक्षक वर्गात कसा शिकवतो, याचे बारकाईने निरक्षण करीत. ते म्हणायचे, शिक्षक चांगला असेल, तर विद्यार्थ्यांची पिढी घडेल. शिक्षक चांगला नसेल, तर विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या बर्बाद होतील. बाबासाहेबांना आम्ही दुरूनच पाहायचो. जवळ जाण्याची कोणाचीच हिंमत नसायची. ज्ञानसूर्य बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान असून, त्यांच्या प्रेरणेतूनच मी पुढे शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे मिलिंदमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांचे सोने झाले. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी देशभरात अनेक क्षेत्रामध्ये मोठमोठ्या पदांवर आहेत. मिलिंद महाविद्यालयाने मला सचोटी, निर्भीडपणा व प्रामाणिकपणाचे संस्कार दिले. हेच संस्कार घेऊन मी आयुष्यात वाटचाल केली.
( संकलन : विजय सरवदे )