बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘तुम्ही शांतपणे शिकवा... विचलित होऊ नका...’, असे म्हणून बाबासाहेब निघून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 04:14 PM2019-04-14T16:14:30+5:302019-04-14T16:16:10+5:30
मिलिंद महाविद्यालयातील प्राध्यापकाविरोधातील तक्रारींची शहानिशा स्वतः बाबासाहेबांनी केली
'मिलिंद'च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी तथा प्रख्यात समीक्षक डॉ. सुधीर रसाळ सांगतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे महान विचारवंत होते. साधारणपणे १९४८-४९ च्या काळात औरंगाबादेत केवळ इंटरपर्यंतच शिक्षणाची सुविधा होती. पुढील शिक्षणासाठी हैदराबादला जावे लागत असे. माझे वडील सरस्वती भुवन शाळेत शिक्षक होते. १९५० साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांनी सुरू केलेल्या पीईएस कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. सुरुवातीला पीईएस कॉलेज व मग नंतर मिलिंद महाविद्यालय, असा या महाविद्यालयाच्या नावाचा प्रवास. सुरुवातीला छावणीतील मिलिटरीच्या बॅरेक्समध्ये वर्ग भरायचे. बाबासाहेबांचा संपूर्ण भर हा शैक्षणिक गुणवत्तेवर होता. सुरुवातीला बाबासाहेबांनी महाविद्यालयासाठी निष्णात आणि तज्ज्ञ प्राध्यापक मुंबई येथून आणले.
बाबासाहेबांना वाटायचे की आपण मराठवाड्यात कॉलेज सुरू करीत आहोत, तर इथलेही प्राध्यापक घ्यावेत.
मात्र, त्यावेळी या भागात फारसे उच्चशिक्षित कोणी नव्हते. एक-दोघे होते. त्यांच्याकडे बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू प्राचार्य म.भि. चिटणीस गेले. तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये शिकविण्यासाठी यावे, अशी विनंती केली; परंतु त्यांनी असमर्थता दर्शविली. मिलिंदमध्ये शिकविणारे प्राध्यापक वेगवेगळ्या राजकीय विचारांचे, जाती-धर्मांचे आणि अत्यंत विद्वान होते. त्याचप्रमाणे या महाविद्यालयात वेगवेगळ्या जाती-धर्मांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकण्यासाठी यावेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचा सहवास लाभावा, असा कृतिशील व उदारमतवादी दृष्टिकोन बाबासाहेबांचा होता. त्यावेळी महाविद्यालयात एकूण १५० विद्यार्थी होते. त्यामध्ये अवघे १५-२० मागासवर्गीय विद्यार्थी होते.
मी बी.ए. प्रथम वर्षात होतो. त्यावेळी विद्यार्थ्यांनी एका प्राध्यापकाच्या अनेक तक्रारी प्राचार्य म.भि. चिटणीस यांच्याकडे केल्या. बाबासाहेब दरवर्षी साधारणपणे जून- जुलैमध्ये औरंगाबादेत येत असत. तेव्हा त्यांना ही बाब समजली. वर्ग सुरू असताना मागच्या दरवाजातून हळूच बाबासाहेब वर्गात आले व बाकावर बसले. आमचे लक्ष समोर फळ्याकडे असल्यामुळे बाबासाहेब मागे बसलेले असल्याचे समजलेच नाही; परंतु प्राध्यापकाला मात्र, घाम फुटला. बाबासाहेबांविषयी सर्वांनाच आदरयुक्त भीती होती. तब्बल १५-२० मिनिटे बाबासाहेब बाकावर बसून होते. प्राध्यापक विचलित झालेले पाहून ‘तुम्ही शांतपणे शिकवा... विचलित होऊ नका...’, असे म्हणून बाबासाहेब निघून गेले. विद्यार्थ्यांचा समज झाला की, आता त्या प्राध्यापकाची खैर नाही. बाबासाहेब त्यांना काढून टाकतील; पण तसे काही झाले नाही. बाबासाहेब तक्रारींची दखल घेत. स्वत: त्यातील तथ्य तपासत व मगच निर्णय घेत असत. हा त्यांचा अलौकिक गुण होता.
( संकलन : विजय सरवदे )