बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘जुगाड’मुळे ‘युगयात्रा’ या नाटकाचा प्रवास यशस्वी झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 06:55 PM2019-04-14T18:55:08+5:302019-04-14T18:56:33+5:30
शिक्षणाबाबत या ज्ञानी पुरुषाची दृृष्टी म्हणजे हत्तीवरून सुई दिसावी अशी होती
नागसेनवनात शिक्षण संस्था सुरू करून बाबासाहेबांनी मराठवाड्याला नवी शैक्षणिक दृष्टी दिली. मराठवाड्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना दिली. पालकांच्या मनात असलेला मुला-मुलींतील भेदभाव दूर केला. बाबासाहेबांनी खास मुलींसाठी बससेवा सुरू केली. मागास मराठवाड्यातील प्रत्येक घटकाला उच्चशिक्षित करण्यासाठी बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर करून त्यांना एक नवा शैक्षणिक दृष्टिकोन दिला. शिक्षणाबाबत या ज्ञानी पुरुषाची दृृष्टी म्हणजे हत्तीवरून सुई दिसावी अशी होती, अशी आठवण ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. त्र्यंबक महाजन यांनी सांगितली.
मराठवाड्यातील मागासलेपण दूर करण्यासाठी या भागात त्यांनी उच्चशिक्षणाचा प्रसार केला. निजाम राजवटीत असलेल्या मराठवाडावर उर्दू भाषेचा प्रभाव होता. बाबासाहेबांनी कॉलेजच्या अगोदर मिलिंद हायस्कूल सुरू केले. हास्कूलमध्ये मी उर्दू शिकवत असे. विद्यार्थ्यांचे आकलन आणि प्राध्यापकांच्या शिकविण्याच्या हातोटीवर बाबासाहेबांचे विशेष लक्ष असायचे. एकदा वर्गात शिकवीत असताना बाबासाहेब अचानक वर्गात येऊन बसले. बाबासाहेब समोर असल्यामुळे माझ्यावर फार मोठे दडपण आले. त्यावेळी मी स्वत:ला सावरत विचार केला की, बाबासाहेब कोकणातील असल्यामुळे उर्दू भाषेबाबत त्यांना फारसे माहिती नसेल. मी विद्यार्थ्यांना उर्दू गजल शिकविण्यास सुरुवात केली. वर्ग संपताच बाबासाहेब मला म्हणाले, ‘तू उर्दू चांगले शिकवतोस; पण तुझा ‘ज’चा नुक्ता चुकला. उर्दू भाषेत ‘ज’चा उच्चार तू काढतो, तसा नसतो’, हे लक्षात ठेव.’ बाबासाहेबांच्या या सूक्ष्म निरीक्षणाने मी चकित झालो.
पुढे मी ‘बी.ए.’च्या अंतिम वर्षात असताना गॅदरिंगमध्ये हुंडा प्रतिबंधक चळवळीवर अधारित ‘जुगाड’ हे नाटक सादर केले. तेव्हा बाबासाहेब प्राचार्य म.भि. चिटणीस सरांना म्हणाले, ‘काय रे, हुंड्याचा आपला प्रश्न नाही.’ तेव्हा चिटणीस म्हणाले, ‘आपल्या दैनंदिन प्रश्नांवर (मागासवर्गीयांची अवस्था) नाटक नाहीत आपल्याकडे.’ हे ऐकून बाबासाहेब म्हणाले, ‘तू लिहितोस का.’ बाबासाहेबांसमोर नाही म्हणण्याची हिंमत नव्हती किंवा बाबासाहेबांना शब्द देणे सोपी गोष्ट नव्हती. तरीही मोठ्या हिमतीने चिटणीस म्हणाले, ‘मी लिहितो.’ त्यांनी मग ‘युगयात्रा’ हे नाटक लिहायला सुरुवात केली. चिटणीस सरांनी हे नाटक लिहिले व मी ते बसविले. मनुस्मृतीच्या काळापासून आंबेडकरांपर्यंतचा प्रवास त्या नाटकात होता. केवळ ‘जुगाड’मुळे ‘युगयात्रा’ या नाटकाचा प्रवास यशस्वी झाला.
एकदा बाबासाहेब मिलिंदच्या व्हरांड्यात बसलेले असताना एक विद्यार्थी गाढवावर बसून त्याला पळवत होता. हे पाहून बाबासाहेबांनी त्याला आवाज देऊन थांबविले. त्याच्या हातावर जोरात चापट मारली व ते म्हणाले, ‘काय रे, मी हेच संस्कार दिलेत का तुम्हाला. वर्ग नसेल, तर लायब्ररीत जाऊन अभ्यास कर.’ या महाविद्यालयातून आदर्श विद्यार्थी घडावेत, अशी तळमळ बाबासाहेबांची होती.
म.भि. चिटणीस यांनी लिहिलेले ‘युगयात्रा’ हे जगातील एकमेव नाटक असेल, जे बाबासाहेबांसोबत नागपूर येथे दीक्षाभूमीवर १९५६ मध्ये लाखो लोकांनी एकाच वेळी पाहिले.
(संकलन : विजय सरवदे )