विद्यापीठातून थेट बाभळगाव...!

By Admin | Published: June 29, 2014 11:47 PM2014-06-29T23:47:03+5:302014-06-30T00:37:18+5:30

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कक्षात बसून तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी शनिवारी तालुक्यातील बाभळगाव येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Babhgaon directly from university! | विद्यापीठातून थेट बाभळगाव...!

विद्यापीठातून थेट बाभळगाव...!

googlenewsNext

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कक्षात बसून तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी शनिवारी तालुक्यातील बाभळगाव येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आॅडीओ कॉन्फरन्सच्या या उपक्रमातून एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या तज्ज्ञांमार्फत सल्ला दिला जात आहे.
कुलगुरू डॉ.बी.व्यंकटेस्वरलू यांच्या मार्गदर्शनाखाली हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषी उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरडवाहू शेती तंत्रज्ञानावर आधारित विविध पीक प्रात्यक्षिके बाभळगाव येथे राबविण्यात आली. विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा लाभ केवळ लाभार्थी शेतकऱ्यांनाच नव्हे, तर संपूर्ण गावातील शेतकऱ्यांना झाला पाहिजे, यासाठी आॅडीओ कॉन्फरन्सद्वारे हे गाव विद्यापीठाशी जोडावे, असे कुलगुरू डॉ.व्यंकटेस्वरलू यांनी सूचित केले होते. त्यानुसार कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या वतीने बाभळगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ५५ ते ६० शेतकरी या मेळाव्यात सहभागी झाले होते. आपली कामे आटोपून निवांत वेळेत म्हणजे सायंकाळी हा मेळावा घेण्यात आला.
डॉ.एल.बी. चौलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळाव्यात शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.आनंद गोरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माऊली पारधे, विद्यापीठाचे डॉ.एल.बी. चौलवार, डॉ.आनंद गोरे, रिलायन्स फाऊंडेशनचे दीपक केकान, निलेश डंबारे, अमोल मोते यांनी परिश्रम घेतले.
उपक्रमाबद्दल ज्ञानोबा पारधे, विठ्ठल पारधे, गुलाब दळवे, विजय घोरपडे, कैलास धुमाळ, उत्तम दळवे, ज्ञानोबा दळवे आदींनी समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)
आतापर्यंत २२ कार्यशाळा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने आतापर्यंत २२ ठिकाणी अशा प्रकारे आॅडीओ कॉन्फरन्स आयोजित करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. पाथरी तालुक्यातील देवनांद्रा, सिमूरगव्हाण, देगाव, खडी (ता.पालम), मालेगाव (ता.पूर्णा), चारठाणा (जिंतूर), बांदरवाडा, हट्टा (ता.सेलू), झरी (ता.परभणी) आदी ठिकाणी हे मेळावे झाले आहेत.
कापसामध्ये लागवडीचे अंतर काय असावे, अन्नद्रव्य व्यवस्थापन, खतांचा कार्यक्षम वापर, सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर, कीड व रोगांच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय, जलसंधारण सरी, संरक्षित सिंचन, तणनाशकाचा वापर याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Babhgaon directly from university!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.