बाबूजींनी महाराष्ट्राला दिशा दिली, मानवतेचा संदेश दिला : विजय दर्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 09:50 AM2022-02-21T09:50:37+5:302022-02-21T09:51:15+5:30
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण
औरंगाबाद : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा हे त्याग, तपस्या व मानवतेचे ज्वलंत उदाहरण होते. ‘लोकमत’ तर त्यांनी उभा केलाच; शिवाय, संपूर्ण महाराष्ट्रालाही त्यांनी दिशा दिली. त्यांनी दिलेला मानवतेचा संदेश आपणास कायम प्रेरणा देत राहील, असे उद्गार लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी काढले. ‘लोकमत’च्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करताना ते बोलत होते.
बाबूजींच्या कार्यावर प्रकाश टाकताना विजय दर्डा म्हणाले, महाराष्ट्रातल्या औद्योगिकीकरणात बाबूजींनी मोठे योगदान दिले. वस्त्रोद्योगाचे नवीन धोरण त्यांनीच आणले. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देत बाबूजींच्या आठवणींना उजाळा दिला. बाबूजी हे ऊर्जा देणारं व्यक्तिमत्त्व होतं. मोठी स्वप्नं पाहा आणि ती प्रत्यक्षात उतरवा, असा संदेश ते नेहमी देत असत. बाबूजींच्या दूरदृष्टीमुळेच औरंगाबाद लोकमत उभा राहिला. लोकमत परिवार ही संकल्पना त्यांनी रुजविली, असे आदरयुक्त उद्गार राजेंद्र दर्डा यांनी काढले. याप्रसंगी आर्किटेक्ट राजन नाडकर्णी यांचा विजय दर्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Here we are with one of the most inspiring leaders Respected Babuji, freedom fighter, Shri Jawaharlalji Darda. His bust was unveiled at #Aurangabad yesterday. Babuji's values & principles propel @lokmat parivar to pursue the path of truth, always. #पत्रकारितापरमोधर्मpic.twitter.com/hvsorSXfHF
— Vijay Darda (@vijayjdarda) February 20, 2022
या कार्यक्रमास आशू दर्डा, पूर्वा कोठारी, सुनीत कोठारी, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, रचना दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, शीतल दर्डा, कार्यकारी संचालक व संपादकीय संचालक करण दर्डा, रुचिरा दर्डा तसेच दर्डा व लोकमत परिवारातील सर्व सदस्यांसह उद्योजक पंकज फुलपगर, मनोज बोरा, सुरेश साकला उपस्थित होते. संपादक चक्रधर दळवी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.