घाटीतून पळविले बाळ, पण परिचारिका, मावशींच्या सतर्कतेने दोन तासात शिशू पुन्हा आईच्या कुशीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:02 AM2021-02-24T04:02:02+5:302021-02-24T04:02:02+5:30
जुना मोंढा-जाफरगेट परिसरात शोध घेऊन मिळविले बाळ औरंगाबाद : घाटी रुग्णालयातून नवजात शिशूला सर्वांची नजर चुकवून एका महिलेने पळविल्याची ...
जुना मोंढा-जाफरगेट परिसरात शोध घेऊन मिळविले बाळ
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातून नवजात शिशूला सर्वांची नजर चुकवून एका महिलेने पळविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. जन्मानंतर काही तासातच पोटचा गोळा नजरेआड झाल्याने आईने हंबरडा फोडला. पण रिक्षाचालक, परिचारिका, मावशींच्या सतर्कतेने दोन तासातच हे बाळ पुन्हा आईच्या कुशीत विसावले आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
सोनाली दिगंबर हराळे (रा. लिंबे जळगाव, गंगापूर) यांची सोमवारी सकाळी घाटीत प्रसूती झाली. त्यांनी मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर त्या वाॅर्ड - ३० मध्ये दाखल होत्या. त्यांच्यासोबत त्यांची आई आशाबाई हिवाळे या होत्या. त्यांना मंगळवारी सकाळी सुटी देण्यात येणार होती. त्यामुळे त्या सकाळी ७ वाजता वाॅर्डातील अगदी अलीकडच्या खाटेजवळ येऊन थांबल्या होत्या. सुटी होणार असल्याने बाळाला खाटेवर सोडून या दोघी माय-लेक कपडे बदलण्यासाठी गेल्या. हीच संधी साधून एका महिलेने हे बाळ उचलून घाटीतून धूम ठोकली.
काही मिनिटांत माय-लेक खाटेजवळ आल्यानंतर त्यांना बाळ दिसले नाही. त्यामुळे दोघींनी आरडाओरडा सुरू केला. ही बाब लक्षात येताच वाॅर्डातील काही परिचारिका आणि मावशींनी सर्वत्र शोध सुरू केला.
गल्लीत जाईपर्यंत महिलेवर लक्ष ठेवल्याने लागला शोध
प्रसूती विभागातील कर्मचाऱ्यांनी घाटी परिसरातील रिक्षाचालकांना विचारणा केली, तेव्हा बाळासह असलेल्या एका महिलेला रिक्षाचालक उस्मान खान मेहमूद खान हे घेऊन गेल्याचे कळले. त्यामुळे तात्काळ उस्मान खान यांना फोन करून घटनेची माहिती दिली. तेव्हा उस्मान खान हे त्या महिलेला जुना मोंढा- जाफरगेट परिसरातील पेट्रोल पंपाजवळील एका गल्लीजवळ सोडून घाटीकडे परत येत होते. घाटीतून जातानाच त्यांना शंका आली होती. त्यामुळे ती महिला कुठे जाते, हे त्यांनी पाहिले होते. ते लगेच पुन्हा त्या गल्लीजवळ पोहोचले.
...म्हणे हे माझेच ५ दिवसांचे बाळ
पाठोपाठ घाटीतील परिचारिका, मावशी त्या गल्लीजवळ पोहोचल्या. नेमक्या कोणत्या घरात महिला गेली, हे माहीत नव्हते. त्यामुळे परिचारिका, मावशींनी प्रत्येक घराचे दार वाजवून बाळाचा शोध घेतला. अखेर एका घरात हे बाळ मिळाले. तेव्हा हे ५ दिवसांचे बाळ आपलेच असल्याचा दावा महिलेने केला. पण बाळ एक दिवसाचे होते. त्यामुळे ते लगेच लक्षात आले आणि बाळ पळविणाऱ्या महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले.
सुरक्षा व्यवस्था पोकळ, घटनेच्या पुनरावृत्तीचा धोका
बाळ पळविणारी महिला वॉर्डात दोन दिवसांपासून चकरा मारत होती. सोनाली हराळे यांच्याशी ओळख असल्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करत होती. सकाळी ७ ते ८ या वेळेत वाॅर्ड ३० जवळ सुरक्षारक्षक नसतो. रात्रपाळीतील सुरक्षारक्षक जाऊन अन्य सुरक्षारक्षक येईपर्यंत एक तास कोणीही नसतात. हीच संधी साधून महिलेने बाळाला पळविले.
या कर्मचाऱ्यांनी घेतला स्वयंस्फूर्तीने बाळाचा शोध
परिसेविका उज्ज्वला वारने, आशा सोनवणे, चतुर्थश्रेणी कर्मचारी सुनीता बनकर, फसाहात बेगम सय्यद हबीब, कल्पना शेंडे, उषा जाधव, बेबी काकडे, कडूबाई अल्हाट, माया हिवराळे यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वयंस्फूर्तीने बाळाचा शोध घेतला. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.