'त्या' नकोशा बाळाचा अखेर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:42 PM2020-10-05T12:42:50+5:302020-10-05T12:43:47+5:30
पाच मुलींनंतर जन्मलेल्या आणि मुलगी समजून आईनेच शेतात फेकलेल्या टणकी येथील बाळाचा सोमवारी सकाळी घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबाद : पाच मुलींनंतर जन्मलेल्या आणि मुलगी समजून आईनेच शेतात फेकलेल्या टणकी येथील बाळाचा सोमवारी सकाळी घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. केवळ १२०० ग्रॅम वजन असलेल्या त्या बाळाची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत होती.
पाच मुलींनंतर सहाव्यांदा परत मुलगीच झाली, असे समजून सुनीता साळुंके या मातेनेच नवजात बाळाला दि. ३० रोजी शेतात फेकून दिले होते. मात्र पुरूष जातीचे अर्भक सापडल्याची चर्चा गावात सुरू झाल्यानंतर हे बाळ माझेच असल्याचे मातेने सांगितले होते.
या बाळावर बुधवारपासून घाटीतील बालरोग विभागाच्या वार्ड क्रं. २५ येथे उपचार सुरू होते. बाळाला जंतुसंसर्ग झाला होता आणि त्याला वॉर्मरमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही बाळाचे प्राण वाचू शकले नाहीत.
दि. ३० सप्टेंबररोजी सुनीता यांना पोटात दुखत असल्याने त्या शेतात शौचास गेल्या. त्याचठिकाणी त्यांची प्रसूती झाली. पण भेदरलेल्या अवस्थेत आणि पुन्हा मुलगी झाली असे समजून त्या बाळाला तिथेच टाकून आल्या आणि चक्कर येत होती म्हणून घरी येऊन झोपल्या. गावात चर्चा सुरू झाली असता, तिने हे सत्य सांगितले.