सतर्कतेमुळे वाचले बाळ; ‘ती’ माता २० दिवसांच्या बाळाला पाण्यात बुडवी अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 03:57 PM2020-10-29T15:57:41+5:302020-10-29T16:00:14+5:30
मनोरुग्ण महिलेची २० दिवसांपूर्वीच शेजारी राहणाऱ्या महिलांच्या मदतीने प्रसूती झाली.
औरंगाबाद : ‘वेड्या आईची वेडी माया’ असे म्हटले जाते; परंतु एक मनोरुग्ण माता स्वतःच्या अवघ्या २० दिवसांच्या बाळाला पाण्याच्या डबक्यात बुडवीत होती. दिवसभर त्याला घेऊन फिरत असे. बाळाच्या अंगावर कपडे घालत नव्हती. तिच्या कुटुंबियांनाही बाळाचा ताबा देत नव्हती. अखेर सामाजिक कार्यकर्त्या आणि दामिनी पथकाच्या मदतीने बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले असून, लवकरच बाळाचे आणि मनोरुग्ण मातेचे पुनर्वसन केले जाणार आहे.
शहरातील गांधीनगर भागात एका मनोरुग्ण महिलेची २० दिवसांपूर्वीच शेजारी राहणाऱ्या महिलांच्या मदतीने प्रसूती झाली. प्रसूतीनंतर या मनोरुग्ण मातेने बाळाचा ताबा घेतला. तिच्या आई-वडील, भावांनी बाळ स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ती आक्रमक होत होती. गेले काही दिवस ही माता बाळाला घेऊन दिवसभर परिसरात फिरत होती. परिसरातील पाण्याच्या डबक्यात बाळाला आंघोळ घालत होती. हा प्रकार काही लोकांनी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा चुडीवाल यांना कळविला. शिल्पा चुडीवाल यांनी या महिलेविषयी अधिक माहिती घेतली.
सदर महिला बाळाचा सांभाळ करू शकत नव्हती. त्यातून नवजात बाळाचे हाल होत होते. अखेर सामाजिक कार्यकर्त्या, पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले. कुटुंबियांनी बाळाचे पुनर्वसन करण्यासाठी बालकल्याण समितीची मदत घेतली. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक स्नेहा करेवाड, पोलीस उपनिरीक्षक बागूल, पोलीस नाईक आशा गायकवाड, पोलीस शिपाई गिरिजा आंधळे यांनी बुधवारी बाळाचा ताबा घेतला आणि अधिक उपचारासाठी घाटीत दाखल केले.
कुत्र्याचेही बाळावर भक्ष्य म्हणून लक्ष
या बाळाला कुत्र्याकडून उचलून नेण्याचा प्रयत्न झाला; परंतु एका महिलेच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार टळला. त्या महिलेने बाळाला जवळ घेतले; परंतु तेव्हा मनोरुग्ण माता त्या महिलेवरच धावून गेली होती.