आठ महिन्यांतच बालोद्यानाची दुरवस्था
By Admin | Published: September 23, 2014 11:06 PM2014-09-23T23:06:11+5:302014-09-23T23:23:19+5:30
हिंगोली : शहरातील रेल्वे वसाहतीत लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बालोद्यानाची अवघ्या आठ महिन्यांतच रया गेली.
हिंगोली : शहरातील रेल्वे वसाहतीत लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बालोद्यानाची अवघ्या आठ महिन्यांतच रया गेली. लहान मुलांसाठी आणलेले साहित्य मोडकळीस आले असून उद्यानाचे प्रवेशद्वार सताड उघडे राहात असल्याने गुरे-ढोरे, कुत्री तेथे ठाण मांडून बसत आहेत.
२८ जानेवारी २०१४ मध्ये महाप्रबंधक प्रदीपकुमार श्रीवास्तव, मंडळ प्रबधंक पी. सी. शर्मा, मुख्य कार्मिक अधिकारी संजय सुरी (सिकंदराबाद) यांच्या उपस्थितीत थाटामाटात उद्घाटन झाले. उद्यानात मुलांना खेळाचे साहित्यही उपलब्ध करुन देण्याची उपस्थितांनी मागणी केली. त्यानंतर घोडा गाडी, साखळी झोका, फिरता झोका तेथे आला. भव्य उद्यानात ही बाब किरकोळच होतीे. मात्र हिरवळ व इतर बाबी सुखावणाऱ्या होत्या. आल्हाद देणाऱ्या होत्या. अधिकारी कुसुवा यांच्या कारकिर्दित उद्यानाची सुस्थितीत होते. त्यांची बदली झाली अन् उद्यानाचे हाल सुरू झाले.
सताड उघड्या प्रवेशद्वारामुळे गुरे तेथे चरायला येत आहेत. स्वच्छता नियमितपणे होत नाही. गाजर गवतही वाढले. लहान मुले तर सोडा मोठ्यांनाही तेथे जाणे सोयीचे वाटत नाही. काही दिवसांपूर्वी या उद्यानाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात होते. गवत काढण्यासाठी दोन ते तीन महिला कार्यरत होत्या. आता कोणी तिकडे ढुंकूनही पाहत नाही. रेल्वे प्रशासनाने चांगल्या हेतूने उभारलेल्या या उद्यानाची वाताहात पाहून शहरवासी नाराज आहेत.(वार्ताहर)