अवघ्या काही तासांवर आला महामॅरॅथॉनचा थरार,जाणून घ्या महामॅरॅथॉन मार्ग, पार्किंग आणि गाईड लाईन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 05:39 PM2021-12-11T17:39:34+5:302021-12-11T17:46:59+5:30
BackOnTrack Maha Marathon: महामॅरॅथॉनच्या मार्गावरील डावी बाजू सकाळी ४ ते १०या वेळेत धावपटूंसाठी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.
औरंगाबाद : लोकमत समूहातर्फे आयोजित व मुख्य प्रायोजक धूत ट्रान्समिशन व पॉवर्ड बाय आयकॉन स्टील प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉन अवघ्या काही तासांतच सुरू होणार आहे. विभागीय क्रीडा संकुलावरून रविवारी सकाळी सुरू होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये औरंगाबादकर धावण्यास सज्ज झाले आहेत.
या महामॅरेथॉनसाठी ऑनलाईन नोंदणीसंपल्यानंतर आज लोकमत भवन येथे बिब एक्स्पोवेळी इच्छुकांना स्पॉट रजिस्ट्रेशनची संधी देण्यात आली. आज होणाऱ्या बिब एक्स्पो कार्यक्रमात सायंकाळी ५ वाजता शहरातील अनुभवी रनर आयर्नमॅन नितीन घोरपडे यांचे मार्गदर्शन धावपटूंना लाभणार आहे. रविवारी ५, १० आणि २१ कि. मी. अंतरात औरंगाबाद महामॅरेथॉन विभागीय क्रीडा संकुल येथे होणार आहे.
धावपटूंसाठी ‘गाईड लाईन्स’
रविवारी महामॅरेथॉनमध्ये विभागीय क्रीडा संकुल येथे येताना आणि मैदानावर धावपटूंनी कोरोनाविषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. कोरोना प्रतिबंधक दाेन लसी किंवा महामॅरेथॉनच्या ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंनी रिपोर्टिंग टाईममध्ये पोहोचणे आवश्यक आहे तसेच मैदानावर एकत्रित न होता गर्दी टाळणे, मॅरेथॉनस्थळी असताना मास्क घालणे हे नियम पाळावे लागणार आहेत. स्टेडियमबाहेर गेल्यानंतर धावताना धावपटू मास्क काढू शकतील. तथापि, धावताना स्पर्धकांत सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. अन्य धावपटूला अडथळा होणार नाही, याची काळजीही घ्यावी लागणार आहे. रेस संपल्यानंतर पुन्हा स्टेडियममध्ये पोहोचल्यावर त्यांना पुन्हा मास्क घालणे बंधनकारक आहे. मैदानात प्रत्येक धावपटूला फूडबॉक्स दिले जाणार आहेत. मात्र, धावपटूंनी मॅरेथॉन रेस संपल्यानंतर फूडबॉक्स, गुडीबॅग घेऊन मैदानात गर्दी न करता तत्काळ मैदान सोडावे. सार्वजनिक आहार करणे टाळणे आवश्यक आहे. स्टेडियममध्ये स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करावे, असे महामॅरेथॉनचे रेस डायरेक्टर संजय पाटील यांनी सांगितले.
महामॅरॅथॉन मार्गावरील डावी बाजू वाहतुकीस बंद
महामॅरॅथॉनच्या मार्गावरील डावी बाजू सकाळी ४ ते १०या वेळेत धावपटूंसाठी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. स्टेडिअम ते सेव्हन हिल्स, सेव्हन हिल्स ते क्रांती चौक, क्रांती चौक ते व्हिटस् हॉटेल (स्टेशन रोड), व्हिटस् हॉटेल ते पीर बाजार, शाहनूरमियां दर्गा ते क्रीडा संकुल या संपूर्ण मार्गावर सकाळी उजव्या बाजूने वाहतूक सुरू राहील. नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन संजय पाटील यांनी केले आहे.
महामॅरॅथॉनसाठी तीन ठिकाणी पार्किंग
महामॅरॅथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंसाठी सिग्मा हॉस्पिटल, श्रीहरी पॅव्हेलियन आणि गारखेडा परिसरातील महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात व्यवस्था करण्यात आली आहे.