सर्व विभागात अनुशेष, मात्र साहित्यात मराठवाडा पुढारलेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 05:27 PM2021-09-25T17:27:13+5:302021-09-25T17:29:51+5:30
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
औरंगाबाद : मराठवाड्याचा सर्व विभागात अनुशेष आहे, मात्र साहित्यात मराठवाडा पुढारलेला आहे. सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा साहित्य, कला, संस्कृती याविषयी आस्था बाळगून आहेत. त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांना सोबत घेऊन साहित्य चळवळीचे प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली. ते आज दुपारी ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या लोकसंवाद फाऊंडेशन आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. संमेलनाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार, मावळते अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे, आ. सतीश चव्हाण. 'मसाप'च्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे, मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामुपरे, डॉ. चेतना सोनकांबळे, मसापचे उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलीक अतकरे, राधाबाई बिरादार यांची मंचावर उपस्थिती होती.
उद्घाटक म्हणून बोलताना चव्हाण म्हणाले, साहित्यावर अधिकार वाणीने बोलण्याचा अधिकार नाही, मात्र साहित्य चळवळ रुजली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी राजकीय व्यक्तींनी सहकार्य केले पाहिजे. मराठवाड्याचा सर्व विभागात अनुशेष आहे, मात्र साहित्यात मराठवाडा पुढारलेला आहे. राज्याचे पहिले सांस्कृतिक धोरण जाहीर करण्याचा योग माझ्याच कार्यकाळात आला. सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा साहित्य, कला, संस्कृती याविषयी आस्था बाळगून आहेत. त्यामुळे सर्वांनी सोबत घेऊन विशेष बैठकीत साहित्य चळवळीचे प्रश्न मांडू. कृती आराखडा तयार करून प्रश्न सोडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वागताध्यक्ष डॉ. करपे यांनी लोकसंवाद फाऊडेशनची निर्मिती, राबविण्यात येणारे उपक्रम आणि मराठवाड्याच्या सांस्कृतिक इतिहासाचा आढावा घेतला. प्रस्ताविकात डॉ. चव्हाण यांनी अवघ्या २५ दिवसात हे साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य उचलले असल्याचे सांगितले. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात मराठवाडा गिताने झाली. यावेळी गोंदण विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. विश्वाधार देशमुख यांनी केले. आभार संकेत कुलकर्णी यांनी मानले.
नाट्यसंमेलन घेणे सोपे, साहित्य संमेलन अवघड
कोरोनाच्या काळात सगळीकडेच अंध:कार पसरलेला असताना औरंगाबादेत साहित्य संमेलन होत आहे ही आनंदाची बाब आहे. मानापमानामुळे एकवेळ नाट्यसंमेलन घेणे सोपे जाईल, पण साहित्य संमेलन घेणे अवघड असते, याची प्रचिती आयोजकांना आलेली असेल, अशी कोपरखळी चव्हाण यांनी यावेळी मारली.