अधीक्षकाविनाच चालते मागासवर्गीय वसतिगृह
By Admin | Published: July 8, 2016 12:07 AM2016-07-08T00:07:16+5:302016-07-08T00:40:54+5:30
पुरुषोत्तम करवा , माजलगाव येथील राहुल मागासवर्गीय वसतीगृहाची दयनीय अवस्था झाली असून, या ठिकाणी शैक्षणकि वर्ष सुरु होवून महिना उलटला तरी पन्नास टक्केही विद्यार्थी संख्या नाही.
पुरुषोत्तम करवा , माजलगाव
येथील राहुल मागासवर्गीय वसतीगृहाची दयनीय अवस्था झाली असून, या ठिकाणी शैक्षणकि वर्ष सुरु होवून महिना उलटला तरी पन्नास टक्केही विद्यार्थी संख्या नाही. तर या ठिकाणी अधिक्षकच नसल्याने संपूर्ण कारभार वाऱ्यावर असल्यामुळे वसतिगृहाची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे.
माजलगाव शहरातील फुलेनगर भागात १९८७ पासुन मातोश्री रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ संचिलत राहुल मागासवर्गीय वसतीगृह चालविले जात आहे. या वसतीगृहाचा कोटा ४२ विद्यार्थ्यांचा आहे. यावर्षीचे शैक्षणकि वर्ष सुरु होवून महिना उलटत आला तरी देखील केवळ २० विद्यार्थी संख्या असल्याचे या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगीतले. विशेष म्हणजे वस्तीगृह चालवताना जबाबदारी व काळजी घेणारे अधिक्षक हे पद महत्वाचे असते, मात्र प्रत्यक्षात अधिक्षक हे केवळ कागदोपत्रीच दाखवले जाते. वसतीगृह सांभाळण्यासाठी अधिक्षक राजेश घायतिडक यांची नियुक्ती असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु ते वसतीगृह सुरु झाल्यापासुन कधीच फिरकले नसल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या ठिकाणी अधिक्षकच येत नसल्यामुळे वसतीगृहाची स्वच्छता व इतर बाबींवर लक्ष देण्यासाठी कोणीही नाही. सुविधांसाठी शासनाकडुन मोठा निधी मिळतो मात्र कसल्याही प्रकारचा निधी खर्च केला जात नाही. शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाप्रमाणे जेवण तर सोडाच जे मिळते ते देखील अर्धे कच्चे व अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचे विद्यार्थी सांगतात. नाईलाजाने विद्यार्थ्यांना वसतीगृहात रहावे लागते.
या बाबत वसतीगृहाचे संचालक किरण खळगे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, सद्या अधिक्षक नसल्याने आम्ही दुसरा अधिक्षक नेमण्याची प्रक्रि या सुरु केली आहे. असे ते म्हणाले.