अतिवृष्टीनंतर खराब हवामानामुळे फळबागांवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 08:18 PM2020-11-23T20:18:14+5:302020-11-23T20:21:50+5:30
हातातोंडाशी आलेले पीक वाया जात असल्याने बळीराजा अडचणीत
पाचोड : जिल्ह्यातील विविध भागांत मोसंबीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात प्रामुख्याने पैठण तालुक्यातील पाचोडसह परिसरात मोसंबीच्या बागा सर्वाधिक असून शेतकरी यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून खराब हवामानाचा फटका या फळबागांना बसत असल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. यंदासुद्धा अतिवृष्टीने शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सध्या थंडीचे दिवस असेल तर ढगाळ वातावरणाचा फटका मोसंबीच्या बागांना बसत आहे.
औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडशी परिसरातील अनेक गावांचा संबंध येतो. या भागातील बोटावर मोजण्याइतके शेतकरीशेतीव्यवसाय करतात. उर्वरित बहुतांश जण फळबागांच्या माध्यमातून सर्वाधिक मोसंबीचे पीक घेत असल्याचे चित्र आहे. पाचोडची मोसंबी सातासमुद्रापार गेलेली असल्यामुळे पाचोडला मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून हवामानातील बदलाचा मोसंबी पिकास मोठा फटका बसत आहे. ऐन बहरात असल्याने कधी अतिवृष्टी तर कधी वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली पीक वाया जात असल्याची परिस्थिती आहे.
मोसंबीसाठी सध्याचे वातावरण पोषक असते. काही प्रमाणात बागा बहरल्या आहेत. या दिवसांत पाचोडसह परिसरात आंबा बहर लागत असल्याने मोसंबीला चांगला भाव मिळताे; पण दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले. सध्या मोसंबीला आंबा बहर फुटण्याची वेळ आहे. मात्र, विविध भागात ढगाळ वातावरण असल्याने आंबा बहरमधील मोसंबीचे पीक धोक्यात आले आहे.
हिवाळ्यातील थंडी ही मोसंबी पिकासाठी अंत्यत पोषक असते. थंडीत चांगली मोसंबी येते; पण सध्या ढगाळ वातावरणामुळे आंबा बहर गळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे सर्वत्र वापसाच नाही, त्यात ढगाळ वातावरणाचा फटका आंबा बहर मोसंबी पिकाला यावर्षी बसण्याची शक्यता आहे.
- शिवाजी भुमरे, शेतकरी
माझ्याकडे साडेतीन एकर शेतीत सातशे मोसंबीचे झाड असून गेल्या वर्षी सात लाखांचे उत्पन्न हाेते. सध्या शेतात मृग बहरची मोसंबी असून झाडाला चांगल्या प्रकारे पीक दिसत असले तरी ढगाळ वातावरणाचा फटका बसणार आहे. मोसंबीला कमी खर्च येत असून उत्पन्न खऱ्यापैकी येत असल्याने नगदी पीक म्हणून मोसंबीची ओळख आहे. पाचोडला मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथील मोसंबीने सातासमुद्रापार आपली ओळख निर्माण केलेली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी पीक वाया जात आहे.
- सुभाष डोईफोडे, शेतकरी वडजी