पशू, पक्ष्यांवर रंगाचे होतात दुष्परिणाम; तत्काळ पशू चिकित्सलयात घेऊन जा
By साहेबराव हिवराळे | Published: March 26, 2024 04:40 PM2024-03-26T16:40:51+5:302024-03-26T16:43:34+5:30
पाळीव पशू, पक्ष्यांना रंगापासून दूर ठेवण्याचे निसर्गप्रेमींचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : होळीत काही जण गाय, बकरी, कुत्रा, मांजर, कबुतर, कोंबडी इ. पशू, पक्ष्यांवर रंग टाकतात. पण या मुक्या जिवांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. रंग अंगावर पडलेली पाळीव प्राणी, पशू, पक्षी आढळून आल्यास त्यांना तत्काळ चिकित्सलयात घेऊन जाण्याचे आवाहन निसर्गप्रेमींनी केले आहे.
लहान मुले शक्यतो मस्तीत रंग टाकतात तर ‘धुंदी’त असलेले कुठेही खुशाल रंग उडवून मोकळे होतात. याबाबत जनजागृती केली जात आहे. जनावरांना स्वतःला चाटण्याची सवय असते. यामुळे शरीराला लागलेला रंग पोटात जाऊन गंभीर विकार होण्याची भीती असते. लहान मुलांनी पिचकारीने रंग टाकल्यामुळे मांजरीच्या व श्वानांच्या कानात रंग गेल्यामुळे इजा होऊ शकते. कोरडा रंग नाका-तोंडात गेल्यास श्वास घेण्यास जळजळ होते. श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो. तसेच त्वचारोग व इतर आजार होतात. डोळ्यात रंग गेल्यास डोळा निकामी होण्याचा प्रकार होतो. त्यामुळे पाळीव पशू, पक्ष्यांना रंगापासून दूर ठेवण्याची सूचना निसर्गप्रेमींनी केली आहे.
तात्काळ उपचार करा
पाळलेल्या प्राण्यांना चुकून रंग लागला तरी तात्काळ शाम्पूने आंघोळ घालावी. अंगावरती खाज आल्यास तात्काळ पशू चिकित्सालयात दाखवावे.
- जयेश शिंदे, सचिव, लाईफ केअर संस्था
रंगात रसायन मिश्रणाचा धोका...
रंगाने त्वचा खराब होऊन त्वचेचे आजार होतात. अंगावर टाकलेल्या रंगातील रसायन मिश्रण हे प्रकृतीस धोकादायक असते. यामुळे डोळ्यांना इजा होऊन ते निकामी होऊ शकतात. रंग खेळा; परंतु पाळीव प्राण्यावर नव्हे. रंगाने अंगास जळजळ झाली तर तो प्राणी मानसिक आजारीही होऊ शकतो.
- पशुवैद्यक डॉ. नीलेश जाधव