कोंडी फुटेना; शहरात सुटली कच-याची दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:13 AM2018-02-21T01:13:00+5:302018-02-21T01:13:03+5:30
शहरातील कचराकोंडी फोडण्यात महापालिकेला पाचव्या दिवशीही यश मिळाले नाही. मागील पाच दिवसांपासून साचलेला दोन हजार मेट्रिक टन कचरा आता सडू लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी फोडण्यात महापालिकेला पाचव्या दिवशीही यश मिळाले नाही. मागील पाच दिवसांपासून साचलेला दोन हजार मेट्रिक टन कचरा आता सडू लागला आहे. त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. या दुर्गंधीमुळे शहरातील १५ लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी हाय अलर्ट जारी केला. कच-यापासून रोगराई पसरू नये म्हणून तातडीने ५ टन जंतनाशक पावडर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्लम भागातील नागरिकांसाठी दोन लाख कापडी मास्क वाटप करण्यात येणार आहेत. नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी मनपाची सर्व ३० आरोग्य केंद्रे सायंकाळीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.
नारेगाव येथील शेतक-यांसह बाभूळगाव, पडेगाव, मिटमिटा, चिकलठाणा आदी भागांत नागरिकांनी तीव्र विरोध केला. कच-याने भरलेले ट्रक मध्यवर्ती जकात नाक्यावर उभे आहेत. या कच-यातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, या भागात पाच मिनिटेही थांबणे कठीण झाले आहे. शनिवार ते मंगळवारपर्यंत महापालिकेने कचराच उचलला नाही. अवघा २० ते ३० टक्के कचरा विविध वॉर्डांमध्ये खड्डे करून जिरविण्यात आला. उर्वरित दोन हजार मेट्रिक टन कचरा शहरातील विविध वसाहतींमध्ये पडून आहे. या कच-यातूनही आता दुर्गंधी सुटली आहे. रस्त्याने ये-जा करणा-या नागरिकांना, परिसरात राहणा-यांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती आहे.
अशास्त्रीय पद्धतीने कच-यावर प्रक्रिया : कुठेही खड्डे करणे सुरू; आरोग्यावर परिणाम होण्याची भीती
औैरंगाबाद शहरात कच-याची कोंडी निर्माण होताच मनपाकडून विविध वॉर्डांमध्ये मोठमोठे खड्डे करून ओला व सुका कचरा एकत्रित पुरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही पद्धत अत्यंत चुकीची आणि अशास्त्रीय आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचा दावा या क्षेत्रात काम करणा-या तज्ज्ञांनी केला आहे. कच-यावर कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट आणि बायोगॅस या तीनच पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते.
कच-याच्या प्रश्नावर योग्य तोडगा निघत नसल्याने मंगळवारी महापालिकेने शहरातील विविध भागांत खुल्या जागेत खड्डे करून ओला व सुका कचरा पुरण्याचे काम केले. या पद्धतीवर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.
कचरा वेचक क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून काम करणारे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी सांगितले की, कच-यावर कंपोस्ट प्रक्रिया करण्यात येते. याला ४० दिवस लागतात. वर्मी कंपोस्ट पद्धतीत दहा दिवस लागतात. झटपट प्रक्रिया करणारी पद्धत म्हणजे बायोगॅस होय. खड्डे करून कचरा पुरल्याने नंतर तेथून गॅस बाहेर येईल. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. महानगरपालिकेने कचरा
वेचकांना सोबत घेऊन ओला व सुका कचरा वेगळा करावा, नागरिकांना सोबत घेऊन ओल्या कच-यावर शास्त्रोक्त पद्धतीने ठिकठिकाणी प्रक्रिया करावी. एवढे करूनही कच-याचा प्रश्न सुटणार नाही. शहरात जमा होणारा कचरा जवळपास ५०० मेट्रिक टन आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निघणाºया कच-यावर प्रक्रिया कशी होणार, त्यासाठी मोठी यंत्रणा उभारावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.