गावाचा रस्ता खराब? मग ‘लाल परी’ला ‘रामराम’; पावसाळ्यात अनेक गावांत बस बंद होण्याची भीती
By संतोष हिरेमठ | Published: June 12, 2023 07:34 PM2023-06-12T19:34:18+5:302023-06-12T19:35:47+5:30
वर्षभर नुकसान अन् पावसाळ्यात वाढतो अपघाताचाही धोका
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागांतील खड्डेमय रस्त्यांमुळे वर्षभर एसटी बसचे नुकसान तर होतेच. मात्र, पावसाळ्यात अशा रस्त्यांवरून धावताना अपघाताचीही भीती वाढते. परिणामी, प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे अशा खराब रस्त्यांची यादीच एसटी महामंडळाकडून केली जात आहे. ज्या गावांचा रस्ता खराब, त्या गावातील बससेवा पावसाळ्यात बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एसटी महामंडळाकडून राज्यभरात आगारनिहाय खराब रस्त्यांची माहिती घेतली जात आहे. हे खराब रस्ते ज्यांच्या अंतर्गत आहेत त्यांना देखभाल-दुरुस्तीसंदर्भात कळविण्यात येणार आहे. शहरातील सिडको बसस्थानकातून बहुतांश बस या मुख्य रस्त्यांवरून धावतात. मात्र, मध्यवर्ती बसस्थानकातून ग्रामीण भागासाठी सर्वाधिक बस धावतात. ग्रामीण भागातील रस्ते खराब असण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
सिडको बसस्थानकाची स्थिती
एकूण बस - ८८ दररोज एकूण फेऱ्या - १५२ ------
मध्यवर्ती बसस्थानकाची स्थिती
एकूण बस - १२२ दररोज एकूण फेऱ्या - २१० ----
खराब रस्त्यांचा बसला असा फटका
- इंधन जास्त लागणे.
- पाटे (स्प्रिंग) तुटण्याचा प्रकार.
- हँगर तुटण्याचे प्रकार.
-बसची बाॅडी खिळखिळी होणे.
चालकांनी मध्यवर्ती बसस्थानक आगाराला दिलेली माहिती
बससेवा : रस्त्याची अवस्था
- छत्रपती संभाजीनगर ते तपोवन : वासडी ते तपोवन अरुंद रस्ता. रस्त्यात खूप खड्डे. साधारण १० कि.मी.
- छत्रपती संभाजीनगर ते राजूर : जातेगाव फाटा ते टाकळीपर्यंत रस्ता खराब. मोठे खड्डे, साधारण २५ कि.मी.
- छत्रपती संभाजीनगर ते बोलठाण : गाजगाव-साकेगाव-बोलठाणपर्यंत अरुंद रस्ता. रस्ता अत्यंत खराब.
- देवगावरंगारी ते गाजगाव नवीन रस्त्याचे काम सुरू.
- छत्रपती संभाजीनगर ते दिगाव : खामगाव ते नाचनवेल फाटा एकेरी रस्ता. ठिकठिकाणी रस्ता अत्यंत खराब.
- छत्रपती संभाजीनगर ते मुर्डेश्वर : गिधाडा घाट अत्यंत खराब. गिधाड गावाजवळ २ कि.मी. रस्ता खराब.
- छत्रपती संभाजीनगर ते जातेगाव : बिल्डा ते चिंचोली घाट रस्ता खडबडीत आहे.
- छत्रपती संभाजीनगर ते बोडगा, लोणी : टाकळीपासून २ कि.मी. पुढे खराब रस्ता.
बसचे नुकसान
खराब रस्त्यांमुळे एसटी बसचे नुकसान होते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रस्ते सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. बससेवेची मागणी केली जाते. त्यादृष्टीने रस्तेही चांगले पाहिजेत, याची खबरदारी घेतली पाहिजे.
-श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस
यादी कार्यालयाला देणार
खराब रस्त्यांची यादी तयार केली जात आहे. ही यादी तयार होताच पुढील कार्यवाहीसाठी ती विभाग नियंत्रक कार्यालयास सादर केली जाईल.
-लक्ष्मण लोखंडे, आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक