शेतकऱ्यांसाठी आलेली युरियाची पोती भिजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:02 AM2021-05-31T04:02:11+5:302021-05-31T04:02:11+5:30

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर मालगाडीने आलेली अनेक युरिया खताची पोती शनिवारी पडलेल्या पावसात भिजली. ही भिजलेली पोती रविवारी ...

The bag of urea that came for the farmers got wet | शेतकऱ्यांसाठी आलेली युरियाची पोती भिजली

शेतकऱ्यांसाठी आलेली युरियाची पोती भिजली

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर मालगाडीने आलेली अनेक युरिया खताची पोती शनिवारी पडलेल्या पावसात भिजली. ही भिजलेली पोती रविवारी ट्रकमध्ये तशीच लोड करण्यात आली. त्यामुळे त्याची गुणवत्ता किती कायम राहील, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर मालगाडीतून शेकडो टन युरियाची पोती दाखल झाली होती. आलेला माल थेट ट्रकमध्ये भरणे अपेक्षित होते. मालगाडी थांबून राहिली तर अतिरिक्त भाडे भरण्याची वेळ येते. ही जबाबदारी मालवाहतूकदार अथवा हुंडेकरी यांची असते. दरवर्षी पावसामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन मालधक्क्यावर शेड उभारण्यात आले. परंतु शेडची जागा अपुरी पडत आहे. शेडचा विस्तार करण्याची गरज आहे. त्याकडे दुर्लक्षच होत आहे. या सगळ्यात आलेला माल थेट उघड्यावर उतरविला जातो. अशाप्रकारे शनिवारीदेखील युरियाची शेकडो पोती मालधक्क्यावर उतरविण्यात आली. शनिवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. तेव्हा ही पोती भिजण्यापासून वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पोत्यांवर ताडपत्री झाकण्यात आली. तरीही मोठ्या संख्येने युरियाची पोती पावसात भिजली. मालधक्क्यावर पाणी साचले. त्यात ही पोती रात्रभर पडून होती. काही पोत्यांतील युरियाचे पाणी झाले, काही पोती कडक झाली होती. ही पोती शेतकऱ्यांपर्यंत जाईल. त्यामुळे त्याची गुणवत्ता किती राहील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ताडपत्री झाकल्यामुळे पोती भिजली नाही, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. रेल्वेस्टेशनवर १८ मे रोजी पावसात सिमेंटची पोती भिजण्याचा प्रकार झाला होता.

पाण्याने युरिया विरघळतो, कडक होतो

युरिया भिजला की पाणी होऊन जाते. जी पोती भिजली असतील त्यातील युरियाचे प्रमाण कमी झाल्याची शक्यता असेल. शिवाय युरिया कडक झाला असेल. त्याचा चुरा करून वापरावा लागेल. परंतु अशी पोती शेतकरी घेतील का, हाही प्रश्न आहे.

-डाॅ. भगवान कापसे, फळबागतज्ज्ञ व गटशेती प्रणेते

फोटो ओळ...

१) रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर पावसाच्या पाण्यात अशाप्रकारे युरियाची पोती पडून होती.

२) भिजलेली युरियाची पोती ट्रकमध्ये तशीच लोड करण्यात आली.

Web Title: The bag of urea that came for the farmers got wet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.